अपेक्षांचे ‘रंग’ शासकीय मुद्रणालयात भरणार कधी? | पुढारी

अपेक्षांचे ‘रंग’ शासकीय मुद्रणालयात भरणार कधी?

जे. ई. देशकर

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील एकमेव शासकीय मुद्रणालयात निवडणूक विभागाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक साहित्य छपाईची लगबग सुरू असून, यासाठी दोन पाळ्यांत काम सुरू आहे. इतर छपाईबरोबरच प्रीसाईडिंग ऑफिसर हँडबूकसह प्रीसाईडिंग पोलिंग एजंटची छपाई मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती व्यवस्थापक अजय गंगावणे यांनी दिली.

मराठवाड्यातील न्यायालयीन कामांसाठी 1966 ला म्हणजेच 57 वर्षांपूर्वी शासकीय मुद्रणालयाची निर्मिती झाली. हे मुद्रणालय छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वेस्टेशन परिसरात उभारण्यात आले. सुरुवातीला केवळ हायकोर्टाच्या अपीलीय केसेसची कामेच येथे होत होती. परंतु कालांतराने मराठवाड्यातील शासकीय कार्यालयाला लागणारी सर्वच स्टेशनरीच्या छपाईची कामे या ठिकाणाहून करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लेटर प्रेस (अक्षर मुद्रण), ऑफसेट ते वेबटेकपर्यंतचा प्रवास या मुद्रणालयाने केला आहे. या मुद्रणालयात उर्दूपासून मराठी, इंग्रजी विषयाच्या कामांची छपाई केली जात होती. आता उर्दूची छपाई बंद करण्यात आली आहे. अनेकदा या मुद्रणालयात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील मतपत्रिकाचीही छपाई करण्यात आली आहे.

100 कर्मचारी, दोन पाळीत काम

मुद्रणालयात सुरुवातीला 250 कर्मचारी कार्यरत होते. आता ती संख्या 100 वर आली आहे. कर्मचारी कमी असले तरी आधुनिक यंत्रसामग्रीमुळे पहिल्यापेक्षाही जास्त काम आजघडीला दोन पाळीत करण्यात येत आहे. गोपनीय व वेळेचे बंधन असलेले साहित्य छपाईसाठी अनेकदा तीन पाळींतही काम करून घेण्यात येते. या ठिकाणी आरोग्य विभागासह वन विभागाच्या वार्षिक बजेटची छपाई करण्यात येत असल्याचीही माहित गंगावणे यांनी दिली.

16 प्रकारच्या नियमावलींची छपाई

सध्या या मुद्रणालयात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रीसाईडिंग ऑफिसर हँडबूकसह प्रीसाईडिंग पोलिंग एजंटची छपाई व इतर अशा 16 प्रकारच्या नियमावलींची छपाई सुरू आहे. हे काम वेळेच्या आत करायचे बंधन असल्याने दोन पाळींत करण्यात येत आहे.

Back to top button