आंबेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा; जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

आंबेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा; जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

लोणी-धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू होऊन अर्ध्याहून अधिक काळ उलटला असला तरी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मांदळेवाडी, वडगावपीर, लोणी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे आदी गावे दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी वडगावपीरच्या सरपंच मीरा संजय पोखरकर, मांदळेवाडीचे कोंडीभाऊ आदक, ग्रामपंचायत सदस्या ज्योती गोरडे, लोणीच्या सरपंच ऊर्मिला धुमाळ, शिरदाळेच्या सरपंच जयश्री तांबे, धामणीच्या सरपंच रेश्मा बोराडे व शेतकऱ्यांनी केली आहे.

या परिसरात अत्यल्प पर्जन्यमान असल्यामुळे या वर्षी खरीप हंगाम वाया गेला आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तीन महिने होऊनही पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. काही ठिकाणी तर खरिपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील येत्या काळात भेडसावणार आहे. उगवलेली पिके करपून गेली आहेत. महागड्या बियाण्यांचा व मशागतीचा खर्च शेतकर्‍यांच्या अंगावर पडला आहे

. शेतात पीक उगवले नसल्याने दारातील जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. त्यासाठी शासनाने त्वरित चारा डेपो-छावण्या सुरू कराव्यात, दुबार पेरणीसाठी बी-बियाणे मोफत द्यावी, शेतकर्‍यांना मोफत पीक विमा योजना लागू करून जाचक नियम शिथिल करावेत, शेतमजुरांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अर्थसाह्य योजना राबवावी आदी मागण्या या परिसरातील शेतकरी व युवकवर्ग यांनी केली आहे.

अधिकार्‍यांच्या भेटीनंतर निर्णय नाही

आंबेगावचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी यांनी या परिसरात भेट देऊन दुष्काळग्रस्त परस्थितीचा आढावा घेऊन आता 15 दिवस झाले आहेत. मात्र, अजूनही शासन स्तरावर चारा डेपोसंदर्भात निर्णय होत नाही, ही या भागातील शेतकर्‍यांची मोठी चेष्टा आहे.

ऑगस्ट महिना संपला तरी अजून आमच्या परिसरात पाऊस नाही. ही परिस्थिती खूप भयानक आहे. खरिपाची पिके जळून गेली आहेत. पाणी प्रश्न, चारा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. तुरळक पावसाने काहीच होणार नाही. त्यामुळे या परिसरात कोरडा दुष्काळ जाहीर करावा व चारा डेपो सुरू करावेत.

– संजय पोखरकर, माजी सरपंच, वडगावपीर

लोणी धामणी परिसरात पावसाने दडी मारल्याने या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती
निर्माण झाली असल्याने संभाव्य दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी शासनाने या परिसराची पाहणी करावी. नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी, चारा आणि मागेल त्याच्या हाताला काम व दुष्काळसदृश परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करावा.

– रवींद्र करंजखेले, माजी पंचायत समिती सदस्य

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news