बारामती तालुक्यात दुष्काळाची छाया गडदच | पुढारी

बारामती तालुक्यात दुष्काळाची छाया गडदच

अनिल तावरे

सांगवी(पुणे) : यंदाच्या पावसाळ्यातील तीन महिने संपत आले, तरी एकदाही मोठा पाऊस झालेला  नसल्याने बारामती तालुक्यातील सांगवी परिसरात निरा डावा कालव्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. शेतीसाठी आवर्तन फिरले, तरीही दुष्काळाची छाया गडद झाल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे. आवर्तन येऊन गेल्यावर विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे जमिनीची धग न शमल्याने पाणीटंचाईचे संकट कायम आहे.
या भागात पाऊसच झाला नसल्याने यंदा उसाचे एकरी उत्पादन घटण्याची शक्यता असून, शेतकर्‍यांच्या आर्थिक स्रोतांचा पाझर आटणार आहे. हे दुष्काळसदृश चित्र बदलण्यासाठी किमान दोन-तीन मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. या भयंकर परिस्थितीमुळे शेतकरीवर्गात चिंतेच्या ढगांची दाटी निर्माण झाली आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस होत असतो. त्यामुळे विहिरी व विंधनविहिरींना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असते. उसाच्या लागवडीसह खरिपाची पिकेही मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यानंतर जमिनीची धग शमली जाऊन ओलावा कायम राहतो. परंतु, यंदाच्या पावसाळ्यात एकही मोठा समाधानकारक पाऊस झाला नाही आणि कालव्याचे आवर्तनही येण्यास उशीर झाला. सांगवी भागात यंदा प्रथमच कालव्याचे आवर्तन चक्क 25 दिवसांपेक्षा जास्त चालले, तरी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत फारसा फरक पडताना दिसत नाही.
धरणक्षेत्रात काही प्रमाणात जुलै महिन्यात थोडा पाऊस  झाला, त्यामुळे धरणांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला की सांगवी भागातील शेतकर्‍यांनी नवीन उसाच्या लागवडी केल्या आहेत. परंतु, या भागात पाऊसच झाला नसल्याने नव्याने केलेल्या उसाच्या लागवडी जगवायच्या का जुन्या उसाचे पीक जगवायचे, असे दुहेरी संकट ’आ’ वासून उभे आहे.
उसाच्या उत्पादनवाढीसाठी जितका पाऊसकाळ जास्त तितके उत्पादनवाढीसाठी पोषक असते. खरिपाची पिके बुडाली असतानाच उसाच्या उत्पादनात घट येणार असल्याने शेतकर्‍यांच्या आर्थिक स्रोतांच्या पाझरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. सध्या कालव्याचे आवर्तन फिरून गेले असले, तरी भविष्यात दोन-तीन मोठा पाऊस झाला नाही, तर यंदाच्या भयंकर दुष्काळाला सामोरे जाण्याशिवाय पर्यायच उरणार नाही.
हेही वाचा

Back to top button