

पुणे : पुढारी वृत्तसेवा
शहरातील रस्तेखोदाईसाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांकडे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पुढील सात दिवसात या अर्जावर निर्णय घेतला जाणार आहे. केवळ पोलिसांच्या 'ना हरकत' प्रमाणपत्राच्या दिरंगाईमुळे होणारा विलंब टाळून रस्त्यावरील विकासकामे लवकर मार्गी लागणे शक्य होणार आहे.वाहतूक पोलिसांकडील रस्तेखोदाईच्या परवानगीबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेकडून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने समान पाणीपुरवठा योजना, नवी सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार लाइन टाकणे अशा स्वरूपाच्या विविध कामांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्तेखोदाई करावी लागते. त्यासाठी आधी वाहतूक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे; जेणेकरून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आणि सुरक्षितता राखणेे शक्य होईल.
रस्तेखोदाईच्या परवानगीसाठी महापालिकेकडून ऑनलाइन अर्ज केला जातो. मात्र, त्यासाठी पोलिस प्रशासनाकडून परवानगी देताना अनेकदा विलंब होतो, त्याचा परिणाम थेट कामांवर होतोे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत पालिकेचा प्रस्ताव आल्यानंतर सात दिवसांत परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापेक्षा अधिक कालावधी लागणार असेल, तर महापालिकेच्या विभागप्रमुखांनी वाहतूक पोलिस उपायुक्तांशी संपर्क साधून चर्चा करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात, असे या बैठकीत ठरले.