

उमेश कुलकर्णी
दौंड: दौंड बसस्थानक व एसटी आगाराच्या नूतनीकरणासाठी 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, या बसस्थानकावर गेल्या कित्येक वर्षांपासून चिटपाखरूनही फिरकत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हे बसस्थानक दुर्लक्षित आहे. त्यामुळे या बसस्थानकावर होणारा खर्च वायाच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दौंड शहरातच एसटी बसस्थानक उभारण्याची मागणी दौंडकरांतून केली जात आहे.
सध्याचा दौंड एसटी डेपो शहरापासून दूर म्हणजे सुमारे साडेतीन किलोमीटर दूर आहे. त्यामुळे शहराचा आणि या बसस्थानकाचा तसा थेट काही संबंध येत नाही. हा बस डेपो 1990 मध्ये बांधलेला आहे, त्यानंतर याकडे कायमच दुर्लक्ष झाल्याचे दौंडकर सांगतात. शहरापासून दूर असल्याने येथे सुविधांची मोठी वानवा आहे. सध्या हे बसस्थानक भग्नावस्थेत असल्याचे आढळून येते. येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. भितींना, पायऱ्यांना तडे गेले आहेत. येथील कर्मचाऱ्यांनाही पिण्याचे पाण्याची सोय नाही. कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनाही बाहेरून पाणी आणावे लागते. स्वच्छतागृह फक्त नावापुरतेच उरले आहे. या स्थानकात दिवसभरात एकही बस येत नाही. येथे केवळ दुरुस्तीसाठीच बस येतात. येथील नगर मोरीपासून 1 किलोमीटर आत असलेल्या या बसस्थानकावर प्रवाशी बसची अजितबातच वर्दळ नसते. अशा उपयोगात नसलेल्या बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी 7 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा झाली आहे.
या डेपोकडे जाण्यासाठी कोणतीही सोयीची वाहतूक व्यवस्था नसते. येथून शहरात ये-जा करण्यासाठी प्रवाशांना रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. मात्र अशा प्रवाशांकडून रिक्षाचालक 100 ते 150 रुपये भाडे आकारतात. गेली कित्येक वर्षे अशी प्रवाशांची लूट सुरूच आहे. यातून एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांना आर्थिक आणि गैरसोय अशा दुहेरी अडचणींना तोंड देण्याची वेळ येते. परिणामी दौंडमध्ये बसस्थानक असूनही नागरिकांची अडचण वाढल्याचे बोलले जाते. आडमार्गावर असलेल्या या बसस्थानकासह परिसरात महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर आहे. शहरापासून तुटक असलेल्या या बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळेस असामाजिक घटना घडण्याची शक्यताही जास्त असल्याचे दौंडकर सांगतात. अशा असुरक्षित आणि स्मशानासारख्या अवस्थेतील बसस्थानकासाठी होणा-या खर्चातून प्रवाशांना कोणताही थेट फायदा होणार नाही. तर ठेकेदारांचे खिसे भरण्याचे काम यातून होणार असल्याची चर्चा सध्या दौंडमध्ये रंगली आहे.
एकदा डागडुजी तरी दुरवस्था
या बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत दै. ‘पुढारी’ने 2009 मध्ये सातत्याने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी बसस्थानकाची पाहणी करून मर्यादित स्वरूपाचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आजही हा डेपो अत्यंत दुर्लक्षित, अस्वच्छ व असुरक्षित अवस्थेत आहे.
प्रवाशांसाठी तात्पुरती सोय
सध्या दौंड शहरात एसटी बसच्या प्रवाशांसाठी दीड-दोन वर्षांपूर्वी पिकअप शेड तयार केले आहे. येथे जास्त बसेसला थांबण्यासाठी जागाच नाही. एक बस येथे प्रवाशी घेते आणि वळून निघून जाते. एका बाजूला मोठे बसस्थानक पडून आहे, तर दुसऱ्या बाजूला एसटी प्रवाशांसाठी पिकअपशेडच्या माध्यमातून तात्पुरती सोय केली आहे.
वास्तव आणि प्रश्न
डेपो शहराबाहेर, दळणवळण सुविधा नाही.
डेपो ते शहर प्रवासासाठी 100 रुपये खर्च.
येथे पाण्यासह इतर सुविधांची वानवा.
रात्री असामाजिक घटकांचा मोठा वावर.
महिला, प्रवासी व कर्मचारी असुरक्षित.
दौंडकरांसह बाहेरील प्रवाशांना गैरसोयीचे ठरणाऱ्या या बसस्थानकासाठी कोट्यवधींचा निधी खर्च होणार आहे. या इमारतीचे नूतनीकरण, संरक्षण भिंत, प्रवेशद्वार किंवा सौंदर्यीकरणावर मोठा खर्च होणार आहे. त्याऐवजी हा निधी दौंडमधील पिकअपशेड परिसरात स्थलांतरित करून तेथे बसस्थानक उभारणे अधिक योग्य ठरणार आहे. अन्यथा, या निधीतून बसस्थानकाच्या नावाखाली ठेकेदारांचा फायदा होणार आहे.
वीरधवल जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य