भोर : पुढारी वृत्तसेवा : निरा-देवघर धरणाचे पाणी निरा नदीपात्रात न सोडल्याने नदीपात्रातील बंधारे कोरडे पडले आहेत. वडगाव, उत्रौली, येवली, सांगवी परिसरातील शेतकर्यांची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे नदीपात्रात धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अंकुश खंडाळे यांनी केली आहे. निरा नदीपात्रात तीन ते चार ठिकाणी मोठमोठे बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातील वेनवडी (ता. भोर) येथील बंधार्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. वडगाव येथील बंधार्याची दुरवस्था झाल्याने बंधार्यातून मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे.
यामुळे साठवून ठेवलेले पाणी दोनच दिवसांत बंधार्यातून वाहून जाते. परिणामी, शेतीसाठी परिसरातील शेतकर्यांना पाण्याचा तुटवडा भासतो. वडगाव डाळ येथील बंधार्यातील पाण्यावर येवली, सांगवी, वडगाव, उत्रौली येथील शेतकर्यांची घेवडा, भुईमूग, सोयाबीन, कांदा, गहू, हरभरा ही पिके अवलंबून होती. मात्र, बंधार्याला गळती असल्याने बांधार्यातील पाणी वाहून गेले आहे. बंधारा कोरडा पडल्याने पिके धोक्यात आली आहेत.
निरा-देवघर धरणातील नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी वारंवार पाटबंधारे विभागातील अधिकार्यांशी चर्चा केली, तरीही पाणी सोडण्यात आले नाही. लवकरात लवकर निरा नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे, असे खंडाळे यांनी सांगितले. भोर तालुक्यात निरा-देवघर व भाटघर धरण असूनही तालुक्यातील शेतकर्यांना पाणी मिळत नाही, अशी तक्रार शेतकर्यांनी केली आहे. कालवा सल्लागार बैठकीत ठरल्याप्रमाणे निरा-देवघर धरणाचे पाणी सोडण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी एस. एस. किवडे यांनी सांगितले.
हेही वाचा