पुणे : पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांना 26/11 सारखे काहीतरी मोठे घडवायचे होते. मात्र, पुणे पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांच्या समोर दहशतवाद्यांचा निभाव लागू शकला नाही. कोथरूडमधील त्या कारवाईमुळे राजस्थान, महाराष्ट्र तसेच पुणे इसिसच्या मोड्यूलचा पर्दाफाश झाला. सप्टेंबर महिन्यात कोथरूडमध्ये चारचाकी चोरताना तिघांना अटक केली होती. त्यामध्ये अटक केलेले महंमद युनूस महंमद याकू साकी आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान यांच्याकडील तपासात त्यांच्याकडे ड्रोनचे साहित्य व तसेच स्फोटकाच्या पांढर्या गोळ्या तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. तर त्यांचा एक साथीदार फरार झाला होता.
राजस्थानमधील स्फोटके बाळगल्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरीया (इसिस) च्या बंदी असलेल्या अलसुफा या संघटनेशी कनेक्शन असल्याचे कारवाई केल्यानंतर उघड झाले होते. त्यातील दोन दहशतवादी सुरवातीला मुंबईत नंतर तेथून पुण्यात आले होते. त्याच दहशतवाद्यांचे राजस्थान, मुंबई, पुणे त्याबरोरच आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा पुणे पोलिसांकडून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला होता. त्या तपासावर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) देखील लक्ष ठेवून होती.
तपासादरम्यान एटीएसच्या हाती मोठे धागेधोरे लागले. त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या विश्लेषणावरून त्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरमधील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी जंगलाची रेकी करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला होता. दहशतवाद्यांनी आपली ओळख लपविण्यासाठी त्यांनी हॉटेलचा आधार न घेता त्यांनी जंगलात राहण्यासाठी टेन्टचा वापर केला. त्यांना या दरम्यान बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षणदेखील मिळाले.
एटीएसने एक पाऊल पुढे टाकत त्यांना आसरा देणाऱ्या अब्दुल दस्तगीर पठाण याला अटक केली. दरम्यान त्यांना आर्थिक रसद पुरविल्याच्या आरोपावरून समिब काझी या रत्नागिरीच्या युवकाला आर्थिक रसद पुरविल्या प्रकरणी अटक केली. त्या पुढे एटीएसने यापूर्वी एनआयएने इसिसच्या संपर्कात असल्याच्या कारणावरून जुल्फीकार बडोदावाला याला अटक केली होती. त्याचा या गुन्ह्यातही सहभाग असल्याने व त्याने आर्थिक रसद पुरविण्या बरोबरच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे देशभरात घातपात घडविण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले नकाशेही सापडल्याने गुन्ह्याची व्याप्ती वाढली होती.
दरम्यान, एनआयएने 3 जुलै 2023 रोजी मुंबई, ठाणे आणि इतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध घेतल्यानंतर मुंबईतून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातून जुबेर नूर मोहम्मद ऊर्फ शेख अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख अटक केली होती. इसिसच्या महाराष्ट्र गटाचा (मोड्युल) डॉ. अदनान अली सरकार (वय 43) त्यानंतर भिवंडीतून आकिफ नाचन याला अटक झाली होती. बडोदावाला हा तरुण शस्त्र बनविण्याचे तसेच इम्प्रोव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडीज) तसेच हातबॉम्ब बनविण्याचे तसेच पिस्तूल बनविण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानेच कोथरूडमधून पकडलेल्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले असल्याचेही एनआयएने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते.
एनआयएच्या तपासामध्ये आरोपी हे इसिसचे सदस्य असून त्यांचा लोकांमध्ये दहशत माजविण्याचा तसेच भारताची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका पोहोचविण्याचा उद्देश होता. एनआयएच्या तपासात पुणे मोड्युलचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन परदेशात बसून हे दहशतवादी कृत्य सुरू असल्याचा कट उघड झाले आहे. भारतात अतिरेकी विचारसरणीचा प्रचारचे गुंतागुंतीचे नेटवर्क तपासात उघड झाले आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांनी इसिसचा म्होरक्या खलिफा याच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतल्याचेही समोर आले आहे.
याच दरम्यान ते आयईड बनविण्यात गुंतल्याचे आढळून आले. भारतीय भूमीवर दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा हेतू होता. आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, तेलंगणासह इतर राज्यामध्ये इसिसचा प्रसार करण्यासाठी रेकी केल्याचेही आढळून आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचविण्याच्या दृष्टीने त्यांनी आईडी बनविल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयात दाखल झालेल्या दोन आरोपपत्रातून आतापर्यंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले आहे.
हेही वाचा