पूर्णा: तालुक्यातील शेतशिवारात बांधावरील व सलग क्षेत्रात लागवड केलेल्या गावरान, केशर, तोतापुरी, बादाम, कलमी, निलमसह आदी वाणाच्या आंबा झाडांना यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर मोहोर लदबदून गेला आहे. या झाडांना कैऱ्या लगडलेल्या असून यंदा आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळू शकते. आंबा फळांनी लदबदलेली अंबराई व बांधावरील आंबा झाडे लक्ष वेधून घेत आहेत. कै-या पाहून तोंडाला पाणी सुटू लागले आहे.
सध्या अंबराई खरेदी करण्यासाठी बागवान व्यापारी अंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेत घिरट्या घालू लागले आहेत. धडकपणे अंबराईचे खरेदी विक्री सौदे होताहेत. तर काही शेतकऱ्यांचा आंबा उतरुन घरीच पाचटीत माच लावून पिकविण्याकडे कल आहे. तसेच अधिक दराने बागवानांकडे विक्री करण्याची शक्यता आहे.
कधी नव्हे तो यंदाच्या हंगामात अंबराई बहरल्याने आंब्याची रसाळी शेतकऱ्यांसह सर्वांनाच चाखायला मिळणार आहे. असे असले तरी मागच्या काही दिवसांत ढगाळ वातावरणामुळे गारपीट होते की काय? या भीतीने आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले होते. मात्र, निसर्गाची कृपादृष्टी लाभून आता आकाश निरभ्र होताना दिसू लागले आहे. यामुळे शेतक-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडून फुललेल्या अंबराईकडे पाहून त्यांचे मन रमू लागले आहे.
हेही वाचा