पश्चिम बारामतीला दुष्काळी झळा !

पश्चिम बारामतीला दुष्काळी झळा !

लोणी भापकर : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती पट्ट्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी वेळेवर मिळत नसल्याने या परिसरातील ऊस, कांदा, टोमॅटो, मका, कडवळ आदी पिके जळून गेली आहेत. तसेच काही जणांच्या पेरूच्या बागाही पाणी नसल्याने करपू लागल्या आहेत. पाण्याअभावी पिके जगवायची कशी? असा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत बारामती तालुक्याचे नाव असल्याने शेतकर्‍यांनी चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावेत, पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सुटावे, पीक कर्ज माफ करण्यात यावे अशा अनेक मागण्या शेतकर्‍यांकडून केल्या जात आहेत.
जिराईत पट्ट्यातील अनेक गावांत सध्या जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर लांबच आहे. पुरंदर उपसा सिंचन योजना या भागात फक्त नावापुरतीच उरली आहे. उन्हाळ्यात ही योजना कधीच व्यवस्थित चालत नाही, यावर अधिकार्‍यांचे नियोजन नाही. योजनेचे पाणी मागणार्‍यांना मिळत नाही, ज्यांना मिळते त्यांना पाणी डबल मिळते असे एक ना अनेक प्रश्न आहेत, यावर येथील लोकप्रतिनिधींनी विचार करण्याची गरज आहे.

मात्र नेतेमंडळी, पदाधिकारी मात्र लोकसभेच्या गटातटाच्या चर्चेत अडकले आहेत. त्यांना शेतकर्‍यांचे कोणतेही प्रश्न सध्या दिसत नसून थोड्याच दिवसांत ते दुष्काळी दौरे, घोंगडी बैठका यावर भर देतील. पाण्याचे राजकारण केले जाईल, विविध आश्वासने दिली जातील पण आता सध्या गरज असताना कोणीही या प्रश्नावर बोलायला तयार नाही. गेल्या वर्षी पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांनी व्याजासहित रक्कम भरली होती ती रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार होती. परंतु अजूनही ती रक्कम जमा झालेली नाही. व्याजाची रक्कम त्वरित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी देखील होऊ लागली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news