मीना नदीवरील बंधारे कोरडे; पिके जळू लागल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

मीना नदीवरील बंधारे कोरडे; पिके जळू लागल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल
Published on
Updated on

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील मीना नदीवर असलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडेठाक पडले असून, शेतकर्‍यांची पिके करपू लागली आहेत. वडज धरणातील पाणी नदीपात्रात तत्काळ सोडावे, अशी मागणी शेतकरीवर्गाची आहे. वडज धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले निमदरी, सावरगाव, पिंपळगाव, आर्वी आणि नारायणगाव येथील सगळे बंधारे कोरडे पडले आहेत. दरवर्षी वेळेमध्ये हे बंधारे पाण्याने भरले जात होते. त्यामुळे शेतकरी शेतामध्ये विविध प्रकारची पिके घेत असत. यंदाच्या वर्षी मात्र बंधार्‍यामध्ये वेळेवर पाणी सोडले गेले नाही. परिणामी, पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

उसाची पिके जळू लागली आहेत. तरकारी पिकांना देखील पाणी नसल्यामुळे ही पिके करपली आहेत. वडज धरणामध्ये पाण्याचा साठा कमी असल्यामुळे बंधार्‍यात पाणी सोडता येत नाही, असे सांगितले जात असताना कालव्याच्या माध्यमातून येडगाव धरणामध्ये मात्र पाणी सुरू आहे. त्यामुळे मीना खोर्‍यातील शेतकर्‍यांची नाराजी वाढली आहे.

जुन्नरचे आमदार अतुल बेनके वारंवार सांगतात की, मी आमदार झाल्यापासून शेतकर्‍यांना पाणी कमी पडू दिले नाही; मग आता नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी पाणी का सोडले जात नाही? असा सवाल शेतकरी बांधव व्यक्त
करीत आहेत. याबाबत जलसंपदा विभागाचे नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

येडगाव धरणात पाणी सोडायला धरणात पाणी आहे आणि मीना नदीवरील बंधार्‍यात पाणी सोडायला धरणात पाणी नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचे देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. पाणीपट्टी घ्यायला अधिकारी येतात; मात्र पाणीपट्टी भरून झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या अडचणी काय आहेत, शेतकर्‍यांना पाणी आहे किंवा नाही, हे मात्र कोणी पाहत नाही.

– जयेश खांडगे,
स्थानिक शेतकरी

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news