पावसाळापूर्व कामांना मुहूर्त कधी? फुरसुंगी, होळकरवाडी नागरिकांचा सवाल | पुढारी

पावसाळापूर्व कामांना मुहूर्त कधी? फुरसुंगी, होळकरवाडी नागरिकांचा सवाल

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या फुरसुंगी, उरुळी देवाची, होळकरवाडी, औताडेवाडी, हांडेवाडी, वडाचीवाडी गावातील नालेसफाईची कामे अद्याप करण्यात आली नाहीत. यामुळे सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे पाणी ओढ्याकाठच्या घरांत शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे या परिसरात पावसाळापूर्व कामांना मुहूर्त कधी निघणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

हडपसर-सासवड रस्त्यावरील विठ्ठल पेट्रोल पंपाशेजारील ओढ्यामध्ये परिसरातील सोसायट्यांचे सांडपाणी सोडण्यात आले आहे. ओढ्यात कचरा टाकण्यात येत आहे. आजूबाजूला झाडी-झुडपे वाढली आहेत. या ओढ्यातून अनधिकृतपणे काही जणांनी पाण्याच्या पाइपलाइन नेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी या पाईप लाईनचे जाळे तयार झाले आहे. ओढ्यात आजूबाजूच्या रहिवाशांनी अतिक्रमणेही केली आहेत. आदी कारणांमुळे ओढ्याचे पात्र अरुंद झाले आहे. पावसाळ्यात ओढ्याचे पाणी तुंबून हडपसर-सासवड रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबाही होत आहे.

औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी होळकरवाडी, शेवाळेवाडी, मंतरवाडी या भागातील ओढे व नाल्यांवरदेखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. तसेच त्यात टाकण्यात येत असलेल्या कचर्‍यामुळे ओढ्यांचे पात्र अरुंद झाले आहे. जोरदार पाऊस झाल्याने ओढ्यांचे पाणी पुलावरून वाहत आहे. तसेच लोकवस्तीतदेखील ते शिरत आहे. त्यामुळे या गावातील नालेसफाईची कामेही तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत महापालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
पावसाळा तोंडावर आला असताना भेकराईनगर येथील ओढ्याची अद्यापही साफसफाई करण्यात आली नाही.

फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे महापालिकेतून वगळून नगरपरिषद करण्याची अंतिम अधिसूचना अद्यापपर्यंत निघाली नाही. याबाबत कार्यवाही होत नाही तोपर्यंत या गावांमधील विकासकामे महापालिकेने करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. मात्र, परिसरातील पावसाळापूर्व कामे अद्यापही करण्यात आली नाहीत.

– अमित हरपळे, सामाजिक कार्यकर्ता.

 

हेही वाचा

Back to top button