

पुणे : पाकिस्तान, काश्मीर प्रश्न वेगवेगळ्या स्तरांवर हाताळणे आवश्यक आहे. दहशतवादाविरोधातील संतापाची योग्य हाताळणी आवश्यक आहे. दहशतवाद सहन केला जाणार नाही, हे पाकिस्तानला दाखवून देतानाच चर्चेचा मार्ग खुला ठेवला पाहिजे, असे मत भारताचे पाकिस्तानातील माजी उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी मांडले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवातील पुणे लिट फेस्टमध्ये ''इनसाइड पाकिस्तान : डिप्लोमॅटिक लाइव्ह्ज, पर्सनल ट्रुथ्स'' या विषयावरील सत्रात भारताचे पाकिस्तानातील माजी उच्चायुक्त अजय बिसारिया, माजी राजदूत रुची घनश्याम यांनी सहभाग घेतला. वेदांत अगरवाल यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन परत आले नाही, नऊ क्षेपणास्त्र डागली जातील, याबाबत पाकिस्तानला स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर इमरान खान यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर खान यांनी अभिनंदन यांना परत सोडण्याची तयारी दर्शवली. त्याबाबत इमरान खान यांनी त्यांच्या संसदेत सांगितले. याबाबत झालेल्या वाटाघाटी यशस्वी ठरल्या. पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध होण्याची पाकिस्तानला भीती वाटत होती. अशा वेळी भारताने दहशतवादी तळांवर आपले काम करून घेतले, त्यानंतर शांततेची भूमिका घेतली.
गेल्या ७५ वर्षांच्या भारताच्या इतिहासात भारत-पाक संबंधात भारत लष्करी, राजनैतिक, सॉफ्ट पॉवर, हार्ड पॉवर वापरायला शिकला आहे. सन २०००, २००८ मध्ये तितकी क्षमता नव्हती. १९८० मध्येच हार्ड पॉवर वापरायला हवी होती. ती वापरली असती तर दहशतवाद देशभर पसरला नसता. आता यापुढे दहशतवादी कृत्य केल्यास ऑपरेशन सिंदूरपेक्षा मोठी कारवाई होईल याची पाकिस्तानला कल्पना आली आहे. दहशतवादाबाबत आपली ''न्यू नॉर्मल'' भूमिका असेल, तर पाकिस्तानची न्यू ॲबनॉर्मलची तयारी आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला फिल्ड मार्शल पद मिळाले. ते मुशर्रफ होण्याच्या दिशेने जात आहेत. इमरान खान तुरुंगात असले, तरी त्यांची मोठी शक्ती आहे. इमरान खान प्रचंड लोकप्रिय आहेत. आजही त्यांना दोन तृतीयांश बहुमत मिळू शकते, म्हणून त्यांना तुरुंगात ठेवले आहे. मात्र, इमरान खान यांना धोका आहे.
कंदाहार प्रकरणावेळी विमानाचे अपहरण झाल्याचे कळले. त्यावेळी इस्लामाबादमधील भारताच्या उच्चायुक्तालयात पार्थसारथी उच्चायुक्त होते. आम्ही लगेचच तयारी सुरू केली. भारताकडून प्रतिनिधी म्हणून जाणाऱ्याला तालिबान कसे वागवेल याची काहीच कल्पना नव्हती. त्यावेळी मी किंवा माझे पती घनश्यामही घाबरले नव्हते. घनश्याम यांना कंदाहारला पाठवण्यात आले होते. भारताचा प्रतिनिधी कंदाहारला गेला हे पाकिस्तानला पसंत पडले नव्हते. वाजपेयींचे बसमध्ये बसून पाकिस्तानला जाणे ही अभूतपूर्व घटना होती. वाजपेयी पाकिस्तानात प्रचंड लोकप्रिय होते. मात्र, त्यांच्या भेटीनंतर तीन महिन्यांत कारगिल युद्ध झाले. भारत प्रगती करतो आहे, आर्थिक विकास होतो आहे, लोकशाही वातावरण या विषयी पाकिस्तानातील सर्वसामान्य लोकांमध्ये आदराची भावना आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी जे काही करता येईल ते केले पाहिजे, असे रुची घनश्याम यांनी सांगितले.
बांगलादेश पेटलेला आहे. भारताच्या दृष्टीने ही अस्थिरता घातक ठरू शकते. अजूनही परिस्थिती बदलत असल्याने या संकट काळाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन आवश्यक आहे, असे दोन्ही माजी अधिकाऱ्यांनी सांगितले.