

पुणे : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने निवडणूक आयोग व सत्ताधाऱ्यांवर मत चोरीचा आरोप केला जातो. मात्र, हा आरोप निरर्थक आहे. मतदान केंद्रावर प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी असतात.
मतदान यंत्र ठेवलेल्या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा असतो. अशावेळी मतचोरी कशी शक्य आहे. काँग्रेसला लोक आता मत देत नाहीत. कारण त्यांना मत देऊन त्याचा उपयोग नाही, हे लोकांना उमगले आहे. विरोधी पक्षांबद्दल मतदाराला आत्मीयता राहिलेली नसल्यामुळे ते सातत्याने पराभूत होत असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइं (आठवले) पक्षाच्या वतीने नाना पेठ येथे आयोजित संकल्प मेळाव्यात ते बोलत होत. या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, शैलेंद्र चव्हाण, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, अशोक गायकवाड, हिमाली कांबळे आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदार आणि महायुतीतील भागीदार आहे. महायुती परिपूर्ण झाली असून, यापुढे त्यात भागीदार वाढवू नका. महापालिका निवडणुकीत पक्षाला 12 जागा मिळाव्यात. भाजपच्या साथीने रिपब्लिकन पक्ष आपला विस्तार करत आहे.
पाटील म्हणाले, आगामी महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार, आज नगरपरिषद, नगरपंचायतमध्ये जे यश मिळाले तसेच यश १६ जानेवारीला मिळेल त्यासाठी हा मेळावा आहे.