पिंपरी: ऑनलाईन टास्क पडतोय महागात

पिंपरी: ऑनलाईन टास्क पडतोय महागात

पिंपरी : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने फसवणूक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी (दि. 3) देहूरोड, निगडी आणि वाकड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

पहिल्या गुन्ह्यात केशवराव तानाजी पवार (38, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी त्यांच्या मूळ गावी असताना आरोपी महिलांनी त्यांना टेलिग्रामवर एक लिंक पाठवली. त्यानंतर फिर्यादी यांना एक मेसेज पाठवून व्हिडीओचा रिव्ह्यूचा टास्क दिला. दरम्यान, टास्क पूर्ण केल्यानंतर फिर्यादी यांना सुरुवातीला बक्षीस देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून वेगवेगळ्या कारणांसाठी एक लाख 58 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. हा प्रकार सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा दाखल करून देहूरोड पोलिसांनी शिरवळ पोलिसांकडे वर्ग केला आहे.

तिसर्‍या गुन्ह्यात सोशल मीडियावर सेलिब्रेटींना फॉलो आणि लाईक करायचे काम असल्याचे सांगत एकाची सात लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 18 ते 22 एप्रिल या कालावधीत जोतिबानगर, काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी रवी विक्रम खुणे (36, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अदिती (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी महिलेने फिर्यादी यांना फोन करून आपण एका कंपनीची व्यवस्थापक असल्याचे सांगितले. इंस्टाग्रामवर सेलिब्रिटींना फॉलो व लाईक करायचे पार्टटाईम काम आहे. तसेच, टेलिग्रामवरील काही टास्क पूर्ण केल्यास आर्थिक मोबदला मिळेल, असे आमिष दाखवत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. प्रीपेड टास्क पूर्ण करताना चूक झाल्याने व्हीआयपी अपग्रेडेशनसाठी तसेच, कराराच्या नावाखाली फिर्यादीकडून आरोपी महिलेने सहा लाख 93 हजार 500 रुपये एवढी रक्कम घेत फसवणूक केली. या घटनेचा तपास वाकड पोलिस तपास करीत आहेत.

दुसर्‍या गुन्ह्यात महेश आकाराम सूर्यवंशी (38, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोबाईलधारक नितीन, संदीप, राहुलकुमार वर्मा (तिघांचेही पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 ते 27 मार्च या कालावधीत घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना प्रीपेड टास्कचे काम दिले. त्यातून त्यांना भरपूर पैसे मिळतील असे आमिष दाखवण्यात आले. प्रीपेड टास्क असल्याने अगोदर पैसे भरावे लागतील, असे सांगून फिर्यादीकडून सात लाख 72 हजार 937 रुपये घेत त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news