पिंपरी: मॉर्निंग वॉकच्या वेळेत दस्त नोंदणी

पिंपरी: मॉर्निंग वॉकच्या वेळेत दस्त नोंदणी

राहुल हातोले

पिंपरी (पुणे): मार्निंग वॉकला बाहेर पडा अन् दस्त नोंदणी करा, ऐकून जरा आश्चर्यच वाटेल; परंतु हे खरे आहे. नागरिकांच्या सोयीसाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता दस्त नोंदणीसाठी आपली कामे सोडून अथवा कामावर रजा घेण्याची गरज भासणार नाही. दस्तनोंदणीचे काम आता काही वेळांतच होणार आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने नागरिकांची होणारी गैरसोय टाळून त्यांना वेळेवर आणि सुटीच्या दिवशी देखील सेवा देण्यासाठी रात्र पाळीत काम करण्याचा निर्णय काही वर्षापुर्वीच घेतला गेला. नागरिकांना या सेवेचा लाभ होत असून, आता दस्त नोंदणीसाठी तासन्तास न ताटकळता काही वेळातच नोंदणी करून नागरिक घरी जावू शकत असल्याचे चित्र दापोडी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय 25 मध्ये दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण आठ सह दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. सर्वच कार्यालयामध्ये दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी असते. कधी सर्व्हर डाउन तर कधी विजेचा खोळंबा आदी कारणांमुळे नागरिकांची गैरसोय होताना दिसून येते. त्यामुळे दस्ताची सर्व कामे खोळंबून नागरिकांना दिवस-दिवस ताटकळत बसावे लागते. त्यामुळे नागरिकांचा विनाकारण वेळ वाया जातो. तर आयटीसह एमआयडीसीमधील अनेक कंपन्या सर्व शासकिय आणि निमशासकिय कार्यालयांना शनिवार आणि रविवारी सुटी असल्याने ही कार्यालये देखील बंद असतात. सुटी असून नागरिकांना दस्त नोंदणी करता येत नव्हती. मात्र नोंदणी व मुद्रांक विभागाने अशा नागरिकांसाठी सुटीच्या दिवशी व रात्र पाळीतही दोपोडी येथील 17 व 25 क्रमांकाचे कार्यालयमधून नागरिकांना सेवा देण्याचे काम अविरतपणे सुरू आहे.

या सेवेचा लाभ आयटी कंपनीतील कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे विभागाच्या तिजोरीत मोठा महसूल जमा होत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. हा उपक्रम शहरात यशस्वी असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news