Pune News : वैद्यकीय प्रवेशासाठीचे कटऑफ थेट शून्यावर

Pune News : वैद्यकीय प्रवेशासाठीचे कटऑफ थेट शून्यावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठीचे कटऑफ 50 वरून थेट शून्यावर आणण्यात आले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने पर्सेंटाईल कमी करण्याबाबतची मागणी केली होती. त्यावर मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले असून, वैद्यकीय समुपदेशन समितीने यासंदर्भातील घोषणा केली आहे. फेडरेशन ऑफ रेसिंडंट डॉक्टर्स असोसिएशनसह विविध वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांनी कटऑफ कमी करण्याची मागणी केली होती. नीट पीजीचे खुल्या गटाचे कटऑफ 50 पर्सेंटाईल, पीडब्ल्यूडीसाठी 45 पर्सेंटाईल, तर आरक्षित जागांसाठी 40 पर्सेंटाईल होते.

यावर्षी कटऑफ जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसता. तसेच जागाही रिक्त राहतील, असा दावा संघटनांकडून करण्यात आला होता. आरोग्य मंत्रालयाने ही मागणी मान्य करत कटऑफ थेट शून्यावर आणले आहे. एमएमसीने याबाबतचे पत्रक काढत माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, वैद्यकीयच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्रतेचे पर्सेंटाईल आरोग्य मंत्रालयाकडून शून्य करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर समुपदेशनाच्या तिसर्‍या फेरीसाठी नव्याने नोंदणी व पसंतीक्रम भरता येणार आहेत. नवीन नोंदणी व पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या निर्णयामुळे पात्र झालेले विद्यार्थी नोंदणी करू शकतील. आधी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांना पसंतीक्रमांमध्ये बदल करता येईल. तिसर्‍या फेरीचे वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे एमसीसी कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक दर्जा खालवण्याची भीती

आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयावर टीका सुरू झाली आहे. युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव म्हणाले, महाविद्यालयांच्या रिक्त जागांमुळे हा निर्णय घेतला आहे. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमातील शैक्षणिक दर्जा तर खालावणारच. परंतु, भविष्यातील देशाची आरोग्य व्यवस्थादेखील कोलमडणार आहे. ही बाब सहन केली जाणार नाही. प्रवेशासाठी गुणांची पात्रता 50 वरून शून्य करण्यात येणार असेल, तर या परीक्षेचे महत्त्व काय? त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा फी परत देण्याची जबाबदारी केंद्रातील प्रमुखांनी घ्यावी, असेदेखील यादव यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news