

सासवड: क्रिप्टो करन्सीमध्ये प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची गुंतवणूक उकळल्याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात मोठा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील एका महिलेसह त्यांच्या कुटुंबीयांची २१ लाख ७५ हजार ९०० रुपयांची कथित आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.
या प्रकरणामुळे परिसरातील क्रिप्टो गुंतवणूक व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फिर्यादी हर्षदा अमोल मुऱ्हे (रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुभम जगताप, संतोष कटके, संकेत इनामके, अनिता प्रकाश जगताप (सर्व रा. सासवड ता. पुरंदर) आणि कालिका ज्ञानेश्वर शिंदे (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सप्टेंबर २०२४ पासून आरोपींनी TRILLIONER कंपनीच्या TLC 2.0 प्री-लाँच क्रिप्टो कॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास ४० टक्के बोनस कॉईन, दरमहा ४ ते ५ टक्के परतावा आणि गुंतवणुकीवर दुप्पट ते पाचपट नफा मिळेल, असे आकर्षक आश्वासन देऊन फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर विविध तारखांना आरोपींनी अनिता प्रकाश जगताप आणि कालिका ज्ञानेश्वर शिंदे यांच्या बँक खात्यावर RTGS व ऑनलाइन व्यवहारांद्वारे मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करून घेतली. फिर्यादीकडून आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून एकूण २१.७५ लाखांची गुंतवणूक स्वीकारल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम परत देत विश्वास निर्माण करण्यात आला; मात्र त्यानंतर मूळ रक्कम व उर्वरित परतावा देण्यास टाळाटाळ सुरू झाली.
कंपनीचे मार्केट डाऊन आहे, थोडा वेळ थांबा, अशी कारणे देत आरोपींनी पैसे परत करण्यास नकार दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीत आरोपींनी इतर गुंतवणूकदारांनाही अशाच प्रकारे मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.