

कुरकुंभ: दौंड तालुक्यातील पांढरेवाडी हद्दीतील इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील २ लाख २१ हजार ८५० रुपये किमतीची कॉपर केबल चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणात तब्बल ८ संशयिताना अटक करण्यात कुरकुंभ व दौंड पोलीसांना यश आले आहे. हा प्रकार बुधवाri (दि. ७) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला होता. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्ताफ चांदशेख (रा. स्वामी चिंचोली, ता. दौंड), सोनू मोईन अहमद, शाहआलम रोशन अली, दीपक कुमार शिवचरण, अर्जुन कुमार निगम, नूर मोहम्मद खलील, अतिक रहिमान हजरतअली खान, हनुमंत अंगद लिमकर (सर्व मुळ रा. चंपापुर सिद्धार्थ नगर, जि. गड, राज्य उत्तर प्रदेश, सध्या रा. गुणवरे वस्ती स्वामी चिंचोली, ता.दौंड, जि. पुणे) अशी अटक केलेल्या संशयिताचे नावे आहेत.
याबाबत अधिक माहितीनुसार, इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून वरील किमतीची कॉपर केबल चोरट्यांनी चोरून नेली होती. या घटनेच्या तपासाच्या सुचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. पोलीसाचे पथक तयार करुन तपास सुरू केला.
गोपनीय माहितीच्या आधारे, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून, तसेच तांत्रिक माहितीचा आधार घेत ८ संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. यादरम्यान आरोपींच्या चारचाकीची (एमएच १३ एसी ०७८६) तपासणी केली.
यात चोरीला गेलेली कॉपर केबल मिळून आली. संशयित आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चारचाकीसह एकूण १२ लाख २१ हजार ८५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.