पिंपरी(पुणे) : शहरातील मिळकतकराची जास्त थकबाकी असलेल्या दोन हजारापेक्षा जास्त मिळकती महापालिकेच्या कर संकलन विभागाने सील केल्या आहेत. त्यापैकी एक रुपयाही मिळकतकर न भरलेल्या मिळकतीचे टप्प्याटप्प्याने लिलाव करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
जप्त केलेल्या मिळकतींची विक्री कशा पद्धतीने करावी, यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने बुधवारी (दि.26) संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे सभागृहात मंडलाधिकारी व गट लिपिकांना प्रशिक्षण देण्यात आले. कर संकलन विभागाचे सल्लागार अनिल लाड यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख, प्रशासन अधिकारी राजाराम सरगर, नाना मोरे, कार्यालय अधीक्षक विरणक व अधिकारी उपस्थित होते.
जप्त केलेल्या मिळकतींच्या लिलावाची कार्यपध्दती स्थायी समितीने ठरवून दिलेली आहे. लिलाव करताना कशा प्रकारच्या अडचणी येतात, जाहिरात करताना मिळकतीचे मुल्यांकन कसे करावे, मिळकतधारकाला बचावाची संधी देणे, नैसर्गिक न्याय तत्त्वाचा वापर करणे तसेच, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती कर्मचार्यांना दिली.
अनेक आजारी उद्योग हे राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी)मध्ये जातात. अशा मिळकतीच्या कर वसूलीसाठी वेळीच एनसीएलटीकडे न गेल्यास कर बुडण्याची शक्यता असते. त्यामुळे तरतुदींचेही सविस्तर प्रशिक्षण कर्मचार्यांना देण्यात आले.
हेही वाचा