अहमदनगर तालुक्यात 85 टक्के पेरण्या | पुढारी

अहमदनगर तालुक्यात 85 टक्के पेरण्या

शशिकांत पवार

अहमदनगर तालुका : राज्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला असून, इतरत्र पूर परिस्थितीने मोठे नुकसान केले आहे. परंतु, नगर तालुक्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामातील पेरण्याचे नियोजन पावसाअभावी कोलमडले असून, तालुक्यात 85 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या झालेल्या पिकांना रिमझिम पावसाने नवसंजीवनी मिळत असली तरी तालुक्यातील नद्या, नाले, बंधारे, विहिरी कोरड्या ठाक पडलेल्या आहेत. शेतकरी वर्ग चिंतात आहे.

पावसाळा सुरू होऊन दिड महिना होऊनही पावसाचा थांगपत्ता नसल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात कमी जास्त प्रमाणात रिमझिम सरी बरसल्याने उगवण झालेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. पावसाअभावी पेरण्यांची कामे खोळंबली होती. वेळेत पाऊस नसल्याने काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले. मात्र, अशाही परिस्थितीत तालुक्यात 85 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मृग, रोहिणी नक्षत्रात पाऊस झाला नसल्याने बाजरी व मुगाच्या पेरण्यांवर मोठा परिणाम झाल्याचा दिसून येतो. मूग, बाजरीच्या क्षेत्राची जागा सोयाबीनने घेतली आहे. त्यामुळे तालुक्यात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली.

तालुक्यात 61 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरणीचे नियोजन होते. खरीपाच्या नियोजनात मुगाचे 15 हजार हेक्टर क्षेत्र अपेक्षित होते. त्यापैकी केवळ चार हजार 900 हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे. शेतकर्‍यांनी मुगाऐवजी सोयाबीनची पेरणी केली. बाजरीच्या 10 हजार 700 हेक्टरपैकी केवळ चार हजार 358 क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली आहे. यामुळे तालुक्यात मूग, बाजरीचे उत्पादन निम्म्यापेक्षा जास्त घटणार आहे.

तालुक्यात यंदा भूजल पातळी वाढ झालेली नाही. तसेच नद्या, नाले, बंधारे, विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे लाल कांदा लागवडीवर परिणाम होणार आहे. तालुक्यात दोन -तीन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने सुकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्यातील वाळकी, राळेगण, गुंडेगाव, पिंपळगाव माळवी, आगडगाव, चास, जेऊर, डोंगरगण, चिचोंडी पाटीलसह सर्व मंडलात कमी अधिक पाऊस झाल्याने पेरणी केलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

मागील वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने नगर तालुक्यातील बहुतांश नद्या, बांधारे, तलाव तुडूंब भरले होते. चालू वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. बाजरी, सोयाबीनची पेरणी करण्यात आली असून, पिकांचे भविष्य पावसावर अवलंबून आहे. पाण्याअभावी लाल कांद्याचे रोप टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे लाल कांदा लागवडीवर परिणाम होणार आहे.

-रविराज तोडमल, शेतकरी, जेऊर

नगर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पेरण्या
विस्कळीत झाल्या. तालुक्यात आतापर्यंत 85 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत ठिकाणी पेरण्या होतील. मुगाच्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. तालुक्यात बाजरी व मुगाच्या क्षेत्रात घट होऊन सोयाबीनचे क्षेत्र वाढले.

-सिध्दार्थ क्षीरसागर, कृषी अधिकारी, नगर तालुका

तालुक्यात झालेल्या पेरण्या
बाजरी – 4358
मका – 3051
तुर – 4116
मुग- 4930
उडिद – 1156
सोयाबीन – 14184
(आकडे हेक्टरमध्ये)

हेही वाचा

सिंधुदुर्ग : शिवापूर येथील शेतकरी कर्ली नदीपात्रात गेला वाहून

पाथर्डी : पावसाने विजयनगर रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमध्ये साठले पाणी

पाथर्डी : तहसीलच्या दुसर्‍या मजल्यावर प्रांत कार्यालय

Back to top button