धावपट्टी वाढविण्यासाठी सर्वेक्षण करा : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

धावपट्टी वाढविण्यासाठी सर्वेक्षण करा : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे विमानतळ येथील नवे टर्मिनल सुरू झाल्यानंतर देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीच्या गरजेनुसार सुविधा होणार असून, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीच्या दृष्टीने धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी अभ्यास करण्यात यावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पुणे विमानतळ येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 'नव्या टर्मिनलमुळे दहा पार्किंग बेज एरोबि—जने उपलब्ध असून, विमानफेर्‍यांची संख्या 218 पर्यंत पोहोचणार आहे. देशांतर्गत विमान वाहतुकीच्या दृष्टीने पुरेशी व्यवस्था निर्माण होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक वाढविण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील. त्यादृष्टीने आवश्यक अभ्यास करण्यात यावा.' पुरंदर विमानतळाच्या कामाला गती देण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नव्या टर्मिनलसाठी आवश्यक रस्त्याच्या कामालाही गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

ढोके यांनी सादरीकरणाद्वारे पुणे विमानतळ येथील विमान सेवेबाबत माहिती दिली. पुणे विमानतळ येथून दररोज तीस हजार प्रवासी प्रवास करतात, त्यातील सुमारे 540 आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. 2022-23 मध्ये 59 हजार 451 विमानफेर्‍यांद्वारे 80 लाख प्रवाशांनी येथील विमानसेवेचा लाभ घेतला. नवे टर्मिनल सुरू झाल्यावर ही संख्या दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. नव्या टर्मिनलचे क्षेत्रफळ 51 हजार 595 वर्ग फूट असून, ते अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news