राज्यातील 9 पुरातन मंदिरांपैकी तीन मंदिरांच्या संवर्धनाचे काम सुरू

राज्यातील 9 पुरातन मंदिरांपैकी तीन मंदिरांच्या संवर्धनाचे काम सुरू

पुणे :  राज्यातील अतिप्राचीन असलेल्या मंदिरांचे जतन व संवर्धन करण्याची योजना जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने व्याप्ती वाढविली आहे. हे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात आल्यानंतर आतापर्यंत 9 मंदिरांपैकी तीन मंदिरांचे काम करण्यास प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. मात्र, अजूनही सहा मंदिरांच्या संवर्धनाच्या कामासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या पुरातत्त्व विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यास लवकरच परवानगी मिळाल्यानंतर काम सुरू होईल. दरम्यान, या प्राचीन मंदिराच्या जतन व संवर्धन करण्यासाठी किमान दोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यामधील काही रक्कम मिळाल्याने काम सुरू करण्यात आले आहे.

राज्यातील धूतपापेश्वर (राजापूर, रत्नागिरी), खंडोबा मंदिर (छत्रपती संभाजीनगर), पुरुषोत्तम पुरी ( माजलगाव, बीड), कोपेश्वर (खिद्रापूर, कोल्हापूर), गोदेश्वर (सिन्नर, नाशिक), शिवमंदिर मार्कंडेय (चार्मोशी, गडचिरोली), आनंदेश्वर (लासूर, अमरावती), उत्तेश्वर (सातारा), आणि एकवीरा देवी (कार्ला, पुणे), या अतिशय पुरातन असलेल्या मंदिराचे संवर्धन-जतन मूळ वास्तूला कोणताही धोका न पोहचविता करण्याचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळास राज्य शासनानेन दिले आहे.

प्राचीन असलेल्या या 9 मंदिरांपैकी तीन मंदिरे राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित समाविष्ट आहेत, तर उर्वरित पाच मंदिरे केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत आहेत. त्यापैकी राज्य शासनाच्याकडील पुरातत्त्व विभागाकडे धूतपापेश्वर, पुरूषोत्तम पुरी आणि खंडोबा मंदिर या तीन मंदिराची संवर्धनाची जबाबदारी आहे. त्यानुसार या विभागाने रस्ते विकास महामंडळास या तीन मंदिराचे काम करण्यास परवानगी दिली असून, या मंदिरांचे काम मागील काही महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे. मात्र उर्वरित सहा मंदिरांचे जतन व संवर्धनाची जबाबदारी केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या पुरातत्त्व विभागाकडे आहे. या विभागाकडे रस्ते विकास महामंडळाने मंदिराच्या काम करण्याच्या परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. त्यास या विभागाकडून लवकरच सकारात्मक परवानगी मिळेल, त्यानुसार संवर्धनाच्या कामास सुरुवात होणार आहे. असे असले तरी सध्या तरी या सहा मंदिरांच्या कामास परवानगी मिळण्यासाठी रस्ते विकास महामंडळास वाट पाहावी लागणार असल्याचे दिसून आले आहे.

मूळ वास्तूला कोणताही धक्का नाही
राज्यातील अतिप्राचीन असलेल्या 9 मंदिरांचे जतन व संवर्धन योजनेची अंमलबजावणी संस्था म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळ काम करीत आहे. त्यानुसार या मंदिरांच्या कामासाठी चुनखडी आणि गुळाचा लेप तयार करून संवर्धनाबरोबरच या मंदिरांचे रूपडे बदलणार आहे. या मंदिरांचे सौंदर्य अजूनच उजळून जाणार आहे. मात्र मूळ वास्तूला कोणताही धक्का न लावता हे काम करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news