Pune Anant Chaturthi : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आव्वाज किंचित कमी !

Pune Anant Chaturthi : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आव्वाज किंचित कमी !
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्पीकरच्या भिंती, ढोल-ताशांचा दणदणाट यांसह अन्य वाद्यांमुळे लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मार्गावरील दहा चौकांतील आवाजाची पातळी गेल्या दोन वर्षांत शंभर डेसिबलच्या पुढे असल्याचे निदर्शनास आले. तरीदेखील गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवाज किंचित कमी झाला असून, विसर्जन मार्गावरील आवाजाची पातळी सरासरी 101.3 डेसिबल होती, ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.9 डेसिबलने पातळी घसरली.

कोरोनामुळे दोन वर्षे गणेश विसर्जन मिरवणूक रद्द करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षीपासून पुन्हा एकदा जल्लोषात गणेश विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. त्यामुळे ढोलताशा, डीजे यांच्यासह विविध वाद्यांच्या आवाजाला सीमाच उरली नाही. त्याचा परिणाम म्हणजे मिरवणुकीत सहभागी आणि आजूबाजूच्या लोकांना आवाजाचा दणका सहन करावा लागला.

दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाने किती स्पीकर वापरायचे, पथकातील ढोलताशांची संख्या किती ठेवायची याबद्दल पोलिस, गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि ढोलताशा पथकांच्या बैठका होऊन त्यात निर्णय होतो. मिरवणुकीचा वेळ कमी करण्यासाठी, ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी नियमावली जाहीर केली जाते; परंतु यंदाचे ध्वनिप्रदूषण पाहता या बैठकांचा फारसा परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सरासरी 101.3 डेसिबल ध्वनिपातळी, त्यातही गुरुवारी रात्री आठ वाजता खंडूजीबाबा चौकात उच्चांकी 129.8 डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली.

सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविज्ञान विभागातर्फे विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणाची मोजणी करण्यात आली. यंदा या उपक्रमाचे 23 वे वर्ष होते. डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन जयवंत नांदोडे आणि इशिता हुमणाबादकर यांनी केले. सुयोग लोखंडे, इंद्रजित देशमुख, पार्थ धोटे, रणदिग्विजय जाधव, अथर्व डांगे, आदित्य संजीवी, आनंद पाणजकर, तेजस जोशी, शार्दुल लोकापुरे, शितीज राजपूत या विद्यार्थ्यांनी या नोंंदी घेतल्या. इरा कुलकर्णी, सात्विका उदयकुमार, समृद्धी तागडे, गायत्री ठकार, पद्मेश कुलकर्णी, नागेश पवार यांनी आकडेवारीचे विश्लेषण केले.

गुरुवारी (दि. 28) दुपारी बारा ते शुक्रवारी (दि. 29) सकाळी आठ या वेळेत लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख चौकांत ध्वनिपातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यानुसार गुरुवारी दुुपारी बारा वाजता सरासरी 100.2 डेसिबल, सायंकाळी चार वाजता सरासरी 102.7 डेसिबल, रात्री आठ वाजता 113.1 डेसिबल, मध्यरात्री 89 डेसिबल, पहाटे चार वाजता 84.3 डेसिबल, सकाळी आठ वाजता 118.5 डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली.

केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या निकषांनुसार दिवसा निवासी क्षेत्रात 55 डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात 75 डेसिबल, तर रात्रीच्या वेळी निवासी क्षेत्रात 45 डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात 70 डेसिबल ध्वनिपातळी असणे अपेक्षित आहे. विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहात या मर्यादा धुडकावल्या गेल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावर सरासरी 105 डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली होती. त्या तुलनेत यंदा किचिंत घट झाली. मात्र नोंदली गेलेली ध्वनिपातळी आरोग्यासाठी हानिकारकच आहे.

(28 सप्टेंबर दुपारी 12 ते 29 सप्टेंबर सकाळी 8 पर्यंत)

मिरवणूक मार्गावरील ध्वनिपातळी
चौक (डेसिबलमध्ये)
बेलबाग 100.9
गणपती 106.3
लिंबराज 106
कुंटे 107.4
उंबर्‍या गणपती 103.1
गोखले 99.8
शेडगे विठोबा 96.5
होळकर 99.9
टिळक 100
खंडूजीबाबा 90.2
एकूण सरासरी 101.3

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news