पुण्यात 24 तासांत सरासरी 14 मिलीमीटर पाऊस | पुढारी

पुण्यात 24 तासांत सरासरी 14 मिलीमीटर पाऊस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दणदणाटावर तरुणाईचा जल्लोष आणि आकाशातून सहस्रजलधारांचा बाप्पावर अभिषेक असा नयनरम्य सोहळा पुणेकरांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत अनुभवला. 24 तासांत शहरात सरासरी 14 मि.मी. पावसाची नोंद झाली. गुरुवारी दिवस उजाडला तो पावसाने. सकाळी 7 ते 8 पर्यंत शहराच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दुपारी 2 पर्यंत पावसाने उघडीप दिली. शहरात पाऊस एकाच वेळी न पडता थांबून-थांबून पडत होता. दुपारी 3 वाजता पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली.

त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत एकच जल्लोष सुरू झाला. सर्व रस्ते जलमय झाले. नागरिकांनी दुकानाच्या बाजूला आडोसा घेतला. बहुतांश नागरिकांनी छत्र्या, रेनकोट घालून बाप्पांच्या मिरवणुकीत सहभागी होणे पसंत केले. या पावसाने गणेशभक्तांच्या आनंदाला उधाणच आले होते. शिवाजीनगर, स्वारगेट, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, स्टेशन परिसर, कोथरूड, कात्रज, मगरपट्टा या भागात पावसाचा जोर जास्त होता. त्यामुळे रस्त्यावरून पाणी जोरदार वाहत होते.

दुपारी पावसातच केले विसर्जन

गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास नागरिकांनी पावसातच गणरायाचे विसर्जन केले. अनेकांनी पावसात सेल्फी काढत गणरायांना निरोप दिला. दुपारी 3 ते 5 पर्यंत पावसाचा जोर होता. पुन्हा सायंकाळी 6 ते 7 पर्यंत जोरदार जलधारा बरसल्या. त्यानंतर पावसाने बहुतांश भागात उघडीप दिली. रात्री नऊनंतर पुन्हा काही भागात पाऊस सुरू झाला. रात्री दहानंतर पाऊस थांबला. दिवसभर झालेल्या दमदार पावसाने वातावरणात गारवा वाढला होता.

शुक्रवारी पुन्हा पाऊस

गुरुवारी शहरात सरासरी 14 मि. मी. पावसाची नोंद झाली. रात्र सरली, पहाट झाली तसा पाऊस नसल्याने पुन्हा जल्लोष वाढला. शुक्रवारी दुपारी 1 वाजता शहरातील काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. कात्रज ते पद्मावती परिसरात पाऊस होता. मिरवणूक मार्गावर मात्र पाऊस नव्हता. दुपारी 4.30 नंतर पुन्हा पावसाला प्रारंभ झाला.

सिंहगड रस्त्यावर मुसळधार

सिंहगड रोड परिसरातील राजाराम पूल, विठ्ठलवाडी, हिंगणे खुर्द, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव बुद्रुक, नर्‍हे, वडगाव खुर्द, धायरी परिसरात मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी दुचाकी पाण्यामुळे बंद पडल्या, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली.

पावसामुळे कात्रज-कोंढवा रस्ता, गोकूळनगर चौक ते खंडोबा मंदिर रस्ता, कात्रज बाह्यवळण सेवा रस्ता, दळवीनगर आंबेगाव मुख्य रस्ता अशा मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहत होते. सुखसागरनगरमध्ये बनकर शाळेमागे जोरदार पावसाने भिंत कोसळल्याने वाहनाचा चक्काचूर झाला.

जलधारांच्या साक्षीने गणरायाला निरोप

24 तासांत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

  • हडपसर : 14.5
  • चिंचवड : 14
  • बालेवाडी : 11
  • मगरपट्टा : 11
  • शिवाजीनगर : 4.8
  • कोरेगाव पार्क : 4

 हेही वाचा

गणपतीच्या हातातील लाडूला मिळाली 27 लाखांची किंमत

इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गासाठी ‘मोदी आवास योजना’

कोल्हापूर : ‘राजाराम’च्या कार्यक्षेत्रात नवीन 55 गावांचा समावेश

Back to top button