

पुणे: मोबाईलच्या दुनियेतील रमणाऱ्या लहान मुलांना आता रंगीत चित्रांचे, कवितांचे, कथांचे...असे साहित्याचे जग खुणावू लागल्याने बालसाहित्य विश्वात आता पुस्तकांची निर्मिती वाढली आहे. शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील शाळांमधील मुलांपर्यंत पुस्तके पोचू लागल्याने आता प्रकाशकांनी वेगवेगळ्या विषयांवरील नवीन पुस्तके प्रकाशित करण्याला प्राधान्य दिले आहे. राज्यभरातील 70 ते 80 प्रकाशकांकडून बालसाहित्याची निर्मिती वाढली असून, दरवर्षी अंदाजे 200 ते 300 नव्या पुस्तकांची बालसाहित्य विश्वात भर पडत आहे. शालेय विद्यार्थीही लिहिते झाले असून, त्यांचे कथासंग््राह, कवितासंग््राह प्रकाशकांकडून प्रकाशित केले जात आहेत. बालपुस्तकांची विक्रीही वाढल्याने बालसाहित्याचे विश्व नव्या पुस्तकांनी बहरत आहे.
पूर्वी कृष्णधवल असणारी पुस्तके आता सप्तरंगी झाली आहेत. कथांच्या पुस्तकांमध्ये छायाचित्रांचाही मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात येत आहे. लवकर वाचून होतील अशी छोटी पुस्तकांची निर्मितीही होत आहे. त्यामुळेच पु्स्तकांचे विश्व मुलांना खूणावू लागले आहे. 5 ते 14 वयोगटातील मुलांचा ऑडिओ बुक्स, ई-बुक्स कडेही कल आहेच. पण, छापील पुस्तकांना मुले प्राधान्य देत आहेत. राज्यातील एका प्रकाशकाकडून दरवर्षी अंदाजे 15 ते 25 पुस्तके प्रकाशित केली जात आहे. कथांचे विश्व, विज्ञानातील गमतीजमती, माहितीपर पुस्तके, क्रीडा, नृत्य, कला, अशा विविध विषयांवरील पुस्तके मुलांच्या पसंतीस उतरत आहे. शुक्रवारी (दि.14) भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या बालदिनानिमित्त दै. पुढारीने बालसाहित्य विश्वातील या बदलत्या ट्रेंडविषयीचा आढावा घेतला.
याविषयी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे म्हणाले, पुस्तकांमध्ये अधिकाधिक प्रमाणात रंगीत चित्रांचा समावेश, मुलांना समृद्ध करणारे लेखन, अशा पद्धतीने बालसाहित्याचा दर्जा वाढल्याने पुस्तकांची निर्मिती वाढली आहे. उदा. आता 90 टक्के पुस्तके ही पूर्णपणे रंगीत छापली जात असून, नवनवे विषय हाताळले जात आहेत. पालकही मुलांनी पुस्तके वाचावीत यावर प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच प्रकाशकांकडून बालपुस्तकांच्या निर्मितीचे प्रमाण वाढले आहे.
तंत्रज्ञानाचे विविध प्रयोग
पुस्तकासाठी एआयद्वारे तयार केलेले चित्र, ऑडिओ ऐकण्यासाठी पुस्तकात दिलेला स्कॅनर, लहान मुलांसाठीचे दिवाळी अंक, रंगीत चित्रांनी भरलेली पुस्तके आणि पटकन वाचून होतील अशी छोटी पुस्तके... असे नवनवीन प्रयोग बालसाहित्याच्या दुनियेत सुरू आहेत. आम्हीही बालकथा, बालकविता, बालनाट्यावरील पुस्तके प्रकाशित करत आहोत. पुस्तकांना चांगला प्रतिसाद असल्यानेच पुस्तकांची निर्मितीही वाढली आहे. ग््राामीण भागातील मुले, आश्रमशाळांमधील मुले आणि बालसुधारगृहातील मुलेही आज लिहिती झाली आहेत. त्यांनाही आम्ही लेखनासाठी प्रोत्साहित करत आहोत, असे चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील यांनी सांगितले.
लहान मुलांसाठी नव्या विषयांवरील पुस्तके प्रकाशित केली जात आहेत. शाळेतील शिक्षक मुलांना लेखनासाठी प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळेच शाळांमधील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितांची, कथांची पुस्तकेही प्रकाशित होत आहेत. हे चित्र खूप चांगले चित्र असून, अशा नव्या प्रयोगांमुळे बालपुस्तकांची विक्रीही वाढली आहे. आम्हा बालसाहित्यिकांसाठी हे चित्र खूप सुखावणारे आहे.
डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ लेखिका
निश्चितच प्रकाशकांकडूनही बालपुस्तकांची निर्मिती नक्कीच वाढली आहे. कारण पुस्तकांना चांगला मुलांचा प्रतिसाद मिळत आहे. मराठीमध्ये आता मुद्रणकला विकसित झाल्याने पुस्तकांचा दर्जाही उंचावला आहे. बालसाहित्य विश्वाने आता मोठी झेप घेतली आहे. प्रत्येक लेखकांने बालसाहित्याची निर्मिती करावी, असे मला वाटते. मुलांच्या विश्वात डोकावून त्यांना आवडतील, भावतील याविषयांवर पुस्तके लिहावीत. हाच विचार करुन मीही मुलांसाठी लिहिते आणि ते मुलांना भावते. शेवटी मुलांनी पुस्तके वाचावीत आणि ज्ञानसंपन्न व्हावे, हे महत्त्वाचे आहे.
आश्लेषा महाजन, कवयित्री-लेखिका