

गिरिजा कल्याणकर-फुटाणे
खडकवासला: खडकवासला धरण क्षेत्रातील बेकायदा बांधकामे अतिक्रमणे हटविण्याची धडक मोहीम राबवणाऱ्या खडकवासला धरण शाखेच्या शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर-फुटाणे यांना बुधवारी (दि. 12) दुपारी दोन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत तब्बल सहा तास नांदेड सिटी पोलिस ठाण्यात बसविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
या प्रकारामुळे रणरागिणी महिला अधिकाऱ्याला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आई आली नाही म्हणून त्यांची लहान मुले भुकेने व्याकूळ झाली होती. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर रात्री आठ वाजता चौकशीविना गिरिजा कल्याणकर-फुटाणे या सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्या आणि त्या थेट आपल्या घरी पोहचल्या.
या घटनेच्या निषेधार्थ खडकवासला जलसंपदा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून अतिक्रमण कारवाई केल्याने चिडून काही तथाकथित समाजसेवक व समाजकंटकांनी आकसापोटी गिरिजा कल्याणकर-फुटाणे यांच्याविरोधात खोट्या तक्रारी केल्या आहेत. अशी लेखी तक्रार पुणे जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली आहे. खडकवासला जलसंपदा विभागाच्या सरकारी मालकीच्या जमिनीवर खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक आदी ठिकाणी बेकायदा बांधकामे अतिक्रमणे करून तेथे अवैध धंदे, गैरप्रकार सुरू होते.
सोमवार (दि.10) पासून धडक कारवाई करून खडकवासला चौपाटीसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सरकारी जागांवरील बेकायदा बांधकामे अतिक्रमणे हटविण्यात आली. शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. त्यावेळी त्यांना समाजकंटकांनी दमदाटी केली. असे असताना समाजकंटकांनी महिला अधिकाऱ्याच्या विरोधात नांदेड सिटी पोलिस ठाण्यात आंदोलन करून त्यांच्या विरोधात जातीय तणाव कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर-फुटाणे या शासनाच्या आदेशानुसार सरकारी मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात देण्यात आलेल्या खोट्या तक्रारीची चौकशी न करताच त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून सहा तास थांबवण्यात आले.
मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग
वरिष्ठ कार्यालयाच्या लेखी आदेशानुसार रितसर नोटिसा बजावून अतिक्रमण काढण्यात येत आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणारे मोकाट आहेत. उलट त्यांनाच संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे माझ्या सारख्या महिलेचे मनोबल खच्ची होत आहेत. मी खडकवासला धरण कार्यालयातून थेट पोलिस ठाण्यात गेले. महिला अधिकारी असूनही मला चौकशीसाठी तासन् तास बसविण्यात आले. वरिष्ठांनी लक्ष घातल्याने मी रात्री आठ वाजता बाहेर पडले.
गिरिजा कल्याणकर-फुटाणे, शाखा अभियंता, खडकवासला धरण शाखा