चासकमान धरण दुसर्‍यांदा ‘ओव्हरफ्लो’

चासकमान धरण दुसर्‍यांदा ‘ओव्हरफ्लो’

कडूस : पुढारी वृत्तसेवा :  खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (दि. 7) सायंकाळपासून पाऊस सक्रिय झाला आहे. शुक्रवारी (दि. 8) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. परिणामी, पाण्याचा मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने धरण दुसर्‍यांदा 100 टक्के भरले. सुरक्षेच्या दृष्टीने दुपारी साडेतीन वाजता धरणाचे पाचही दरवाजे उघडून सांडव्याद्वारे भीमा नदीपात्र, कालवा आणि अतिवाहिनीद्वारे एकूण 9 हजार 975 क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. एकूण 8.53 टीएमसी साठवणक्षमता असलेले चासकमान धरण यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी 100 टक्के भरले होते.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला धरणात 21.29 टक्के पाणीसाठा होता. सर्वात आधी चासकमान धरणसाखळीत असणारे कळमोडी धरण 17 जुलैला 100 टक्के भरले होते. या धरणातील अतिरिक्त पाणी चासकमान धरणात येत होते. दरम्यान, भीमाशंकर खोर्‍यात झालेल्या पावसाने चासकमान धरणानेही नव्वदी पार केली होती. 28 जुलै रोजी धरणाचे पाचही दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण घटले. हळूहळू पाऊसच थांबला. परिणामी, धरणातील पाणीसाठा काही प्रमाणात कमी झाला होता. ऑगस्ट महिना जवळपास कोरडाच गेला.

त्यानंतर थेट गुरुवारी सायंकाळपासून पाऊस सक्रिय झाला. शुक्रवारीदेखील पावसाने दिवसभर चांगलाच जोर धरला. त्यामुळे चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक 5 हजार क्युसेक वेगाने वाढली आणि धरण दुसर्‍यांदा 100 टक्के भरले. खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून दुपारी साडेतीन वाजता धरणाचे पाचही दरवाजे प्रत्येकी 20 सेंटीमीटरने वर उचलून सांडव्याद्वारे भीमा नदीपात्रामध्ये 9 हजार 125 क्युसेक, कालव्याद्वारे 560, अतिवाहिनीद्वारे 290 क्युसेक असा एकूण 9 हजार 975 क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला.

भीमाशंकर अभयारण्य परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग
खेड तालुक्याच्या पश्चिम भागांत विशेषतः भीमाशंकर अभयारण्य परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासांत 24 मिलिमीटर, तर 1 जूनपासून एकूण 459 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. चासकमान व कळमोडी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने आरळा नदी व भीमा नदीची पात्रे दुथडी भरून वाहू लागली आहेत. पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून विसर्ग कमी-जास्त केला जाणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news