पुणे : पाचव्या फेरीसाठी तेराशे विद्यार्थी इच्छुक | पुढारी

पुणे : पाचव्या फेरीसाठी तेराशे विद्यार्थी इच्छुक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी विशेष पाचवी फेरी सुरू आहे. यामध्ये दहावीच्या पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती; परंतु संबंधित विद्यार्थ्यांनी या फेरीकडे पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, केवळ 1 हजार 335 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरल्याचे दिसून आले आहे. अर्ज भरण्याची मुदत संपली असून, येत्या 11 सप्टेंबरला गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत 326 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेशांसाठी 1 लाख 603 आणि कोटा प्रवेशाच्या 16 हजार 67 अशा 1 लाख 16 हजार 670 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 1 लाख 2 हजार 211 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेर्‍या आणि चार विशेष फेर्‍यांमध्ये कोटा आणि केंद्रीभूत प्रवेश फेर्‍यांतर्गत एकूण 75 हजार 654 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अद्यापही 41 हजार 16 जागा रिक्त आहेत. पाचव्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी 11 सप्टेंबरला जाहीर झाल्यावर 15 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.

राज्य मंडळाने घेतलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे पाचव्या विशेष फेरीमध्ये पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात मात्र संबंधित विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे.

हेही वाचा

पुणे : सांस्कृतिक कार्यक्रमांचे बुकिंग जोरात  

पुणे : शिक्षणसेवा पंधरवड्यात सुटणार प्रश्न

ब्रेस्ट कॅन्सरवर खुलेपणाने चर्चा करणे किती महत्त्वाचं आहे? काय सांगते परिवा प्रणती अभिनेत्री

Back to top button