

निनाद देशमुख
पुणे: चांदणी चौकाचा नवले पूल, वारजे, बावधन, भूगाव, पाषाण, बाणेर, हिंजवडी आणि मुळशीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीशी थेट संबंध आहे. त्यामुळे एखाद्या चौकात पूल बांधून संपूर्ण वाहतूक प्रश्न सुटणार नाही. नवले पूल ते वाकड यादरम्यान वाहनांची संख्या, हिंजवडीतील कार्यालये सुटल्यानंतर वाढणारा दबाव, शनिवार-रविवारचे पर्यटन, मुळशी आणि कोकणकडील वाहतूक, बसथांबे, रिक्षा, खासगी प्रवासी वाहने आणि पादचारी यांचा एकत्रित अभ्यास करावा लागणार आहे.
वाहतूक पोलिस, महापालिका, एनएचएआय, मेट्रो आणि पीएमआरडीए यांच्यातील समन्वयाशिवाय पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार पूर्णपणे कोंडीमुक्त होणे कठीण आहे. सध्या सर्व्हिस रस्त्यांची कामे सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी सिमेंट रस्ते तयार केले जात आहेत. यामुळे मुख्य रस्त्यावरील ताण कमी होण्यास मदत मिळेल. मात्र, एचईएमआरएलपासून ते थेट चांदणी चौकापर्यंत सर्व्हिस रस्त्यावर जाण्यासाठी एकही लेन नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यास नागरिकांना हायवेवरच अडकून राहावे लागते.
नव्या पुलामुळे काय सुधारले?
आठ दिशांना जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र रॅम्प
महामार्गावरील सरळ वाहतूक आणि स्थानिक वाहनांचे विभाजन
कोथरूड, बावधन, पाषाण, एनडीए आणि मुळशीकडे स्वतंत्र जोडणी
जुन्या अरुंद पुलामुळे होणारा मुख्य अडथळा दूर
सामान्य परिस्थितीत चांदणी चौक ओलांडण्याचा वेळ कमी
महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्त्यांची उपलब्धता
कोणत्या समस्या अद्याप कायम?
वाहन बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास तत्काळ वाढणारी कोंडी
सेवा रस्त्यांवर स्थानिक आणि महामार्गावरील वाहनांची गर्दी
वारजे–नवले पूल पट्ट्यात निर्माण होणारा ‘बॉटलनेक’
पौड रस्त्यावरील बॅरीकेडिंग आणि अनधिकृत पार्किंग
अधिकृत बस-बे आणि रिक्षाथांब्यांचा अभाव
पादचाऱ्यांसाठी अखंड आणि सुरक्षित संपर्क व्यवस्था अपुरी
भूगाव रस्ता प्रकल्पाची निविदा रद्द झाल्याने पुढील विलंब
तातडीच्या उपाययोजनांची गरज
चांदणी चौक आणि वारजे येथे क्रेन, टोइंग व्हॅन २४ तास तैनात करावी
वाहन बंद पडल्यानंतर ते हटविण्याची निश्चित कालमर्यादा ठरवावी
सकाळ-सायंकाळच्या गर्दीत अतिरिक्त वाहतूक पोलिस नियुक्त करावेत
एसटी, पीएमपी आणि खासगी बससाठी स्वतंत्र बस-बे तयार करावेत
रिक्षा व प्रवासी वाहनांचे अनधिकृत थांबे हटवावेत
सेवा रस्त्यांवरील पार्किंगवर कडक कारवाई करावी
रॅम्प आणि पर्यायी मार्गांवर मोठे, प्रकाशमान दिशादर्शक फलक बसवावेत
डिजिटल फलकांवर कोंडी व पर्यायी मार्गांची तत्काळ माहिती द्यावी
पादचारी पुलाला बसथांबे आणि मेट्रोस्थानकाशी जोडावेत
नवले पूल ते वाकड या संपूर्ण महामार्ग पट्ट्याचे वाहतूक ऑडिट करावे
मी कोथरूडवरून हिंजवडी येथे कामाला जातो. मात्र, ऑफिसला जाण्याच्या वेळी तसेच येण्याच्या वेळी हमखास या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी लागते. परिणामी, मार्गावरील वाहतूक संथगतीने पुढे जाते. यामुळे इच्छा असतानाही कार्यालयात वेळेवर पोहचता येत नाही. मुळात हा प्रश्न आत्तापर्यंत मार्गी लागले अपेक्षित होता, तो अद्याप झालेला नाही.
श्रीकांत जगताप, आयटी कर्मचारी
चांदणी चौकात एरवी किंवा पिक अवर्समध्ये वाहतूक सुरळीत असते; मात्र, अचानक एखादे जड वाहन, ट्रक बंद पडल्यास किंवा अपघात घडल्यास हायवेवर तातडीने वाहतूक कोंडी निर्माण होते. अशा वेळी वाहनचालकांची अडचण दूर करण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही एनएचआयच्या सहकार्याने विशेष हायड्राची व्यवस्था केली आहे. सध्या परिसरातील सर्व्हिस रोडची कामे युद्धपातळीवर सुरू असून, आगामी फेब्रुवारीपर्यंत ही कामे पूर्ण झाल्यानंतर चांदणी चौकातील वाहतूक अधिक सुरळीत होईल
राकेश गुमाने, सहायक पोलिस निरीक्षक, बावधन वाहतूक विभाग