

खेड : जिल्ह्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील त्रासदायक वाहतूक कोंडीच्या समस्येला अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आमदार बाबाजी काळेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश लाभले असून, राज्य सरकारने या समस्येच्या निराकरणासाठी प्राथमिक स्तरावर 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त 60 कोटींचा निधीदेखील जाहीर करण्यात आला आहे. या निधीतून चाकण परिसरातील 9 प्रमुख रस्त्यांची सुधारणा प्राधान्याने होणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.(Latest Pune News)
चाकण हे पुणे जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असल्याने येथे वाढत्या उद्योगांमुळे आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. दररोज शेकडो वाहने या भागातून प्रवास करतात. परिणामी, नागरिकांना तासन-तास वाट पाहावी लागते. या समस्येच्या सोडवणुकीसाठी आमदार बाबाजी काळे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाकडे पाठपुरावा केला होता. प्रसंगी पावसाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून त्यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर ‘ट्राफिकमुक्त चाकण कृती समिती’ने स्थानिक नागरिकांसह चाकण येथे आंदोलन केले होते.
या प्रयत्नांना वेग मिळाला 28 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दालनात आमदार काळे यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित विभागांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( झचठऊअ) कार्यालयात आयुक्त योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत दुसरी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतः चाकणच्या वाहतूक कोंडीचा पाहणी दौरा करून समस्या जाणून घेतल्या.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणूनच राज्य सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून प्रथम टप्प्यात चाकण औद्योगिक क्षेत्रातील 9 रस्त्यांची व्यापक सुधारणा केली जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे अपेक्षित आहे. या निधीमुळे चाकण पंचक्रोशी परिसरातील नागरिकांचा प्रवास सोपा होईल, अशी आशा आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या 60 कोटींच्या निधीमुळे या महत्त्वाच्या महामार्गाची दुरुस्तीही वेगाने होईल. स्थानिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत असून, कामाच्या अंमलबजावणीसाठी सतर्क राहण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, पीएमआरडीए आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण या सर्व स्तरांवर पाठपुरावा सुरू आहे. लवकरच चाकण वाहतूक कोंडी मुक्त होईल, हे आमचे ध्येय आहे. या लढ्यात सहभागी झालेल्या सर्वसामान्य नागरिक आणि ट्राफिकमुक्त चाकण कृती समितीचे मी आभार मानतो.
बाबाजी काळे, आमदा
या रस्त्यांचा होणार विकास
चिखली ते मोई रस्ता, कुरुळी फाटा ते निघोजे रस्ता, आळंदी फाटा (चाकण) ते आळंदी रस्ता, चाकण-होली बुद्रुक ते आळंदी-मरकळ रस्ता, निघोजे ते मोई, खालुंबे ते एमआयडीसी टप्पा 2, सदुंबरे-वासुली फाटा, सावरदरी ते खालुंबे आणि कुरुळी फाटा ते कुरुळी रस्ता.