

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे केंद्रीय हिन्दी निदेशालय (नवी दिल्ली) आणि सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अँड रिसर्च (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकात्म मानवदर्शन आणि त्याची समकालीन प्रासंगिकता’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. हे चर्चासत्र उद्या गुरुवार (दि. 9) आणि शुक्रवार (दि. 10 ऑक्टोबर) विद्यापीठाच्या स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात संपन्न होणार आहे.(Latest Pune News)
या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन बिहारचे राज्यपाल आरिफ महम्मद खान यांच्या हस्ते होणार असून समारोप सत्रासाठी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी तर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, केंद्रीय हिंदी निदेशालयाचे संचालक प्रा. हितेंद्र कुमार मिश्रा, सेंटर फॉर इंटेग्रल स्टडीज अँड रिसर्च, पुणेचे हरिभाऊ मिरासदार यांची प्रमुख उपस्थिती असेल.
या वेळी प्रसिद्ध लेखक व विचारवंत अभिजित जोग यांचे बीजभाषण होईल. उद्घाटन सत्रानंतर लगेच होणाऱ्या परिसंवादात डॉ. अनिरुद्ध देशपांडे, डॉ. आनंद लेले व डॉ. संजय तांबट हे ‘एकात्म मानवदर्शनाच्या परिप्रेक्ष्यातून शिक्षण’ या विषयावर मंथन करतील. सायंकाळी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी (दि. 10 ऑक्टोबर) आयआयटी मुंबईचे प्रा. वरदराज बापट हे ‘एकात्म मानव दर्शन आणि आर्थिक धोरण’ यावर, पद्मश्री गजानन डांगे ‘अंत्योदय विचार’ तर जे. नंदकुमार हे ‘एकात्म मानव दर्शन आणि राष्ट्रीय संकल्पना’ या विषयांवर आपले विचार मांडणार आहेत. या चर्चासत्रात सुमारे 30 संशोधक विद्यार्थी शोधनिबंधाचे वाचन करणार आहेत.
या वैचारिक मंथनात सहभागी होण्यासाठी अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक रवींद्र शिंगणापूरकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. हरिश नवले व समन्वयक डॉ. मोहीत टंडन यांनी केले आहे.