

पुणे: महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, व्यवस्थापन आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी यंदा मोठी सवलत देण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने प्रवेश पोर्टलमध्ये नवी सुविधा सुरू केली असून, पसंतीक्रम भरताना प्रत्येक महाविद्यालय आणि शाखेचे मागील वर्षाचे पात्रता गुण (कट-ऑफ) थेट स्क्रीनवर दिसणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अंदाजे पसंतीक्रम भरण्याची गरज राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेबसाइट्सवरून कट-ऑफ शोधावे लागत होते. अपुरी किंवा चुकीची माहिती मिळाल्याने अनेकदा अवास्तव पसंतीक्रम भरले जात असत. चांगले गुण असूनही इच्छित महाविद्यालय हातून जाण्याची समस्या वारंवार उद्भवत होती.
सीईटी सेलने ही अडचण ओळखून प्रवेश पोर्टलमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी महाविद्यालय किंवा शाखा निवडताच त्याच्या बाजूलाच मागील वर्षाचा कट-ऑफ दिसेल, ज्यामुळे स्वतःच्या गुणांची तुलना करणे सोपे होईल.
या नव्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना वास्तववादी आणि संतुलित पसंतीक्रम भरणे शक्य होणार आहे. अनावश्यक गोंधळ, धावपळ आणि चुकीच्या पर्यायांमुळे होणारे नुकसान टळणार आहे आणि विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे कॉलेज मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, एमबीए/एमएमएस सारख्या सर्व कॅप अभ्यासक्रमांसाठी ही सुविधा लागू राहणार आहे.
साईटी सेलने प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यापूर्वी या सुविधेची वारंवार चाचणी घेतली असून, सर्व काही सुरळीत चालेल, असे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचे गुण आणि मागील वर्षाचे कट-ऑफ लक्षात घेऊन काळजीपूर्वक पसंतीक्रम भरावा, जेणेकरून उत्तम परिणाम मिळू शकेल. त्यामुळे ही सुविधा यंदाच्या प्रवेशप्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि विद्यार्थी फ्रेण्डली बनवणारी ठरणार आहे.