

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नोव्हेंबर 2022 मध्ये पुण्यात राज्यपालांच्या हस्ते मोठ्या धूमधडाक्यात सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तपासण्या करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. कर्करोगाच्या तपासणीसाठी लागणार्या रसायनांच्या किटच्या कमतरतेमुळे चाचण्या थांबल्या आहेत.
शासकीय रुग्णालयांत दाखल असलेल्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी परवडणा-या दरात किंवा मोफत जनुकीय चाचणी उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली होती. मात्र, महिनाभरापासून प्रयोगशाळेने चाचणी किटच्या कमतरतेमुळे तपासण्या केल्या नाहीत. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये त्यांच्या शरीरातील कोणत्याही अनुवंशिक उत्परिवर्तनाच्या अभ्यासासाठी तपासण्या केल्या जातात. कर्करोगाचे कारण समजल्यास उपचारांची दिशा ठरवता येते. कर्करोगाचे कारण शोधण्यासाठी शासकीय रुग्णालयांतील कर्करोगतज्ज्ञ कर्करोगाच्या रुग्णांचे नमुने पाठवत होते. परंतु, आता प्रयोगशाळेने रुग्णालयांना नमुने पाठवणे थांबवण्यास सांगितले आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील घारपुरे बंगला येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कर्करोग संशोधन प्रयोगशाळेचे नोव्हेंबर 2022 मध्ये उद्घाटन करण्यात आले. अत्याधुनिक प्रयोगशाळेत डीएनए, आरएनए, गुणसूत्रे, प्रथिने आणि प्रथिने यांचे विश्लेषण करण्यासाठी चाचण्या उपलब्ध आहेत. प्रयोगशाळेत उपकरणे येण्यास उशीर झाल्यामुळे आणि निधी उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने एप्रिल 2023 पर्यंत चाचण्या घेतल्या जात नव्हत्या. त्यानंतर चाचण्या सुरू करण्यात आल्या. मात्र, आता किटच्या कमतरेतमुळे पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत.
एप्रिलमध्ये आम्ही चाचण्या सुरू केल्या होत्या. चाचणी किटच्या पुढील संचासाठी ऑर्डर दिली आहे. किटची निवड बारकाईने करावी लागत असल्याने थोडा जास्त वेळ लागू शकतो. निविदा प्रक्रिया पुन्हा राबवली जाणार आहे.
– डॉ सौरव सेन, प्रयोगशाळेचे प्रभारीप्रमुख.
हेही वाचा