प्रशिक्षण केंद्रापासून बॉक्सिंगच ‘वंचित’; केवळ चार ते पाच ठिकाणीच केंद्र

प्रशिक्षण केंद्रापासून बॉक्सिंगच ‘वंचित’; केवळ चार ते पाच ठिकाणीच केंद्र

पुणे : बॉक्सिंगसारख्या खेळामध्ये केवळ एक कांस्यपदकाची कमाई करणार्‍या भारताची विशेषतः महाराष्ट्राची प्रगती काहीशी थंडावलेली दिसून येत आहे. बॉक्सिंगपटू घडविण्यासाठी लागणार्‍या बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचीच राज्यात वाणवा असून केवळ चार ते पाच ठिकाणीच अधिकृत शासकीय केंद्रे सुरू असून शासकीय अनास्थेमुळे प्रशिक्षण केंद्रेच बॉक्सिंग खेळापासून वंचित असल्याचे चित्र आहे. राज्य शासनाच्या वतीने एका बाजूला मिशन लक्षवेध या नावाने क्रीडा क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवीत असताना दुसर्‍या बाजूला बॉक्सिंग खेळाला बॉक्सिंग रिंगच अल्प प्रमाणात असल्याचे चित्र आहे.

पुण्यासारख्या शहरामध्ये क्रीडा खात्याचे मुख्यालय असतानाही सरकारी बॉक्सिंग रिंग उपलब्ध नाही. अकोला, नागपूर यांसह तीन ते चार शहरातच शासकीय बॉक्सिंग रिंग उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त राज्यात कोठेच बॉक्सिंग खेळाचे शासकीय अधिकृत केंद्र नाही. त्यामुळे सरकार आणि क्रीडा प्रशासनाच्या वतीने बॉक्सिंग खेळातील सोयी-सुविधांवर आगामी काळात भर दिला जाणार का याकडे बॉक्सिंगपटूंचे लक्ष लागले आहे.

पुण्याला मिळणार नवी बॉक्सिंग रिंग?

मनोज पिंगळे स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने पुणे महापालिकेला जागा मिळण्याबाबत प्रस्ताव दिलेला होता. हा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आला असून, घोरपडी येथे महापालिकेकडून जागा उपलब्ध होत आहे. अकादमीच्या नावाने टेंडरही निघाले असून, इतर प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्याला नवी बॉक्सिंग रिंग मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.

पुण्यात पर्यायाने राज्यामध्ये बॉक्सिंग खेळाचे प्रशिक्षण केंद्र उभे राहणे आवश्यक आहे. खासगी स्तरावर अनेक अकादमी सुरू असतात. परंतु, प्रत्येक अकादमीमध्ये सर्वसामान्य घरातील मुलाला बॉक्सिंगच्या सरावाला जाणे शक्य होणार नाही. शासनाला यापूर्वीच माझ्या संस्थेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. परंतु, अद्यापही तो दुर्लक्षितच आहे. शासनाने प्रशिक्षण केंद्र सुरू करताना पाच वर्षांच्या करारावर प्रशिक्षक नेमून खेळातील प्रगती पाहणे गरजेचे आहे. शासनाने आता प्रशिक्षण केंद्रासाठी एक पाऊल पुढे टाकावे.

– मनोज पिंगळे, ऑलिंपियन बॉक्सर, अध्यक्ष, मनोज पिंगळे स्पोर्ट्स अकादमी

राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात युवा राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने बॉक्सिंग हॉल तयार करण्यात आला आहे. मात्र, तेथे बॉक्सिंग रिंग नाही. बॅडमिंटन हॉलच्या बाजूला बॉक्सिंग रिंग असून, तेथे काही काळ मेरी कोम हिने सराव केलेला आहे. परंतु, सध्या ही रिंग बंद असून, काही दिवसांपूर्वी शिबिरासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.

– सुधीर मोरे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news