पत्रकारांना स्वस्तातील घरे देण्यासाठी प्रयत्नशील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

पत्रकारांना स्वस्तातील घरे देण्यासाठी प्रयत्नशील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पत्रकारांच्या घरासाठी पुण्यात राबविण्यात येणारा गृहप्रकल्प हा राज्यात ट्रेंडसेटर ठरणार आहे. माध्यमांमध्ये तरुण पत्रकारांची संख्या वाढत असून, त्यांच्या जीवनात स्थैर्य येणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने मोठ्या शहरांत पत्रकारांच्या घरांचा विषय मोहीम म्हणून हातात घ्यावा लागेल. त्याचाच भाग म्हणून पत्रकारांना स्वस्तातील घरे देण्यासाठी गृहकर्जावरील व्याजात सवलत देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी  चर्चा करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुण्यातील प्रकल्पाला पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव पत्रकारनगर असे नाव देण्याचा मानस  मराठी पत्रकार संघाच्या वतीने व्यक्त केला, याचा मला आनंद आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट् मराठी पत्रकार संघ आणि भगवती समुहाच्या वतीने माध्यमकर्मीयांसाठी पुण्यात उभारण्यात येणार्‍या गृहप्रकल्पाचे भूमीपूजन फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. या प्रसंगी ते बोलत होेते. यावेळी दै.पुढारीचे चेअरमन, समूह संपादक डॉ.योगेश जाधव, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, दै.लोकमतचे संपादक संजय आवटे, दै.सकाळचे संपादक सम्राट फडणीस, भगवती ग्रुपचे बाबासाहेब औटी, पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते. यावेळी देशातील अकरा नद्यांचे पाणी जलकुंडात अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
फडणवीस म्हणाले, माध्यमातील शेवटच्या घटकांना सामाजिक सुरक्षा दिली पाहिजे. त्यादृष्टीने असे प्रकल्प हाती घ्यायला हवेत. पत्रकारांना स्वस्तातील घरे देण्यासाठी गृहकर्जावरील व्याजात सवलत देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी चर्चा करीन. पत्रकारांना लागू केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून त्यांच्या कुटुंबियांनाही योजनेच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आहे. महापालिका आणि पीएमआरडीएने नियमात बसवून घरांच्या किंमती कमी करण्याबाबत विचार करावा. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री कार्यालयात आवश्यक असल्यास स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येईल.
डॉ. योगेश जाधव म्हणाले, ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात धावपळ करणार्‍या पत्रकारांना हक्काचा निवारा उपलब्ध करून दिला जात आहे, याचे विशेष कौतूक आहे. फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय दिला. पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्याचा उपक्रम देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला. शेतकरी, पत्रकार वा अन्य समाज घटकांच्या अडचणी सोडविण्यात त्यांचा पुढाकार असतो. राज्यातील पत्रकारांना स्वतःचे घर देण्यासाठी हाती घेतलेला हा उपक्रम महत्त्वाचा आहे. घर म्हणजे केवळ चार भिंती आणि छप्पर म्हणजे घर नाही. भावभावनांचा, नात्यांचा संगम असतो, तिथे घर असते. सर्व पत्रकार एकमेकांच्या जवळ राहतील, त्यांच्यात ऋणानुबंध तयार होतील, हे आनंददायक आहे. पंतप्रधान आवास योजनेतून पत्रकारांसाठी राखीव घरे ठेवा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मी पुणे लोकसभा लढवणार नाही..

पुणे आणि पीएमआरडीएवर माझे विशेष प्रेम आहे. मात्र, याचा अर्थ मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविणार,
असा कोणी काढू नये, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा

Back to top button