कोल्हापूर-वैभववाडी मार्गाची प्रक्रिया सुरू | पुढारी

कोल्हापूर-वैभववाडी मार्गाची प्रक्रिया सुरू

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रक्रिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यादव यांनी सोमवारी सांगितले. कोल्हापूर – मिरज मार्गावर टप्प्याटप्प्याने ‘डेमू’ ऐवजी ‘मेमू’ धावतील, असेही त्यांनी सांगितले.

यादव यांनी सोमवारी सायंकाळी कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गती शक्ती योजनेतून केले जाणार आहे. त्याकरिता डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. डीपीआर मंजूर झाल्यावर निधी उपलब्ध होईल. त्यानंतर भूसंपादनालाही सुरुवात होईल.

कोल्हापूर-मिरज मार्गावर सध्या धावणार्‍या ‘डेमू’ पॅसेंजरबाबत तक्रारी वाढतच आहेत. याबाबत विचारता कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने सर्व ‘डेमू’ बंद केल्या जाणार असून त्याऐवजी ‘मेमू’ (इलेक्ट्रिक इंजिनसह धावणार्‍या रेल्वे) धावणार आहेत, त्याचेही नियोजन केले जात असल्याचेही यादव यांनी सांगितले.

कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, त्याची मागणी असल्याचे सांगत पुणे-मिरज मार्गाचे अद्याप दुहेरीकरण पूर्ण झालेले नाही. ते 2024 अखेर पूर्ण होईल. दुहेरीकरण झाल्यानंतर नव्या गाड्या धावतील, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे अमृत भारत योजनेंतर्गत पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या कामाला गती आली असून येत्या काही महिन्यांत ते पूर्ण होईल, असे यादव म्हणाले. यावेळी त्यांनी स्थानकाच्या विविध विभागाची, अमृत भारत योजनेंतर्गत सुरू असलेल्या पुनर्विकास कामाची पाहणी करत अधिकार्‍यांना सूचना केल्या. यावेळी पुणे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय परिचालन व्यवस्थापक स्वप्नील निला, विभागीय अभियंता विकास श्रीवास्तव, विभागीय विद्युत अभियंता महेश्वरी, स्थानक प्रबंधक आर. के. मेहता, विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, अरिहंत जैन फौंडेशनचे जयेश ओसवाल, जयसिंगपूरचे गजाधर मानधना आदी उपस्थित होते.

Back to top button