

महेंद्र कांबळे
पुणे: 3 ऑक्टोबर 2024 रोजी बोपदेव घाट येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या भीषण घटनेनंतर शहरातील टेकड्या व घाट परिसर सुरक्षित करण्यासाठी 80 कोटींची अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली आहे. कॅमेरे बसले, ड्रोन सज्ज झाले, पॅनिक बटन आणि प्रकाशयोजना उभी राहिली. संपूर्ण व्यवस्था तयार आहे. मात्र, दीड वर्ष उलटूनही ही यंत्रणा प्रत्यक्ष कार्यान्वित कधी होणार? याची ठोस तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे ‘सर्व काही सज्ज; पण स्विच ऑन कधी?’ असा थेट प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.
सामूहिक बलात्काराच्या या घटनेनंतर पोलिसांनी 60 तपास पथके कामाला लावली. घटनास्थळालगतची तब्बल 40 गावे पिंजून काढली. सुमारे 450 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. घाटामार्गे गेलेल्या 50 हजार मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तरीही सीसीटीव्हीअभावी आणि कमकुवत नेटवर्कमुळे तपासात मोठे अडथळे आले. इतक्या व्यापक तपासानंतरही मुख्य आरोपी बराच काळ पोलिसांच्या हाती लागत नव्हता, ही वस्तुस्थिती तितकीच गंभीर होती.
40 गावे, 450 सराईत, हजारो मोबाईल डेटा तपासूनही सूत्रधार सापडत नसल्याने तपास यंत्रणेवर दबाव वाढला होता. प्रत्येक पथक आपापल्या परीने आरोपींचा माग काढत होते. मात्र, ठोस धागा मिळत नव्हता. अखेरीस जुन्या माहितीदारांचे जाळे, गुन्हेगारी वर्तुळातील संपर्क आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा, यामुळे आरोपींपर्यंत पोलिस पोहचले आणि अटक करण्यात यश आले.
या घटनेनंतर टेकड्या सुरक्षित करण्याचा मोठा निर्णय झाला. राज्य सरकारने पुणे पोलिसांना 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. शहर व उपनगरातील 22 टेकड्यांवर 600 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, त्यात 200 पीटीझेड कॅमेरे, ‘एआय’ आधारित ओळख प्रणाली, 177 फ्लडलाइट्स आणि पॅनिक बटन यंत्रणा उभारण्यात आली आहे. सध्या सर्व यांत्रिक आणि तांत्रिक कामे पूर्ण झाल्याचा दावा आहे. कॅमेरे बसले, नियंत्रण कक्षाशी जोडणी झाली, प्रकाशयोजना उभी राहिली. म्हणजे सुरक्षाकवच सज्ज आहे. मात्र, प्रत्यक्ष कार्यान्वयनाचा आदेश निघालेला नाही. टेकड्यांवर फिरणाऱ्या नागरिकांसाठी यंत्रणा तयार असूनही ती सुरू न होणे, हा मोठा प्रश्न ठरत आहे. अशा परिस्थितीत 80 कोटींची यंत्रणा केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. बोपदेव घाटातील त्या भीषण घटनेनंतर उभारलेली सुरक्षाव्यवस्था प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. या हायटेक यंत्रणेच्या माध्यमातून टेकड्यांवरील गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
बसवलेली यंत्रणा अशी करणार काम?
हायडेफिनेशन ड्रोन पेट्रोलिंग : रात्रीच्या अंधारात टेकड्या व घाट परिसरावर हवेतून नजर
संशयित हालचाली त्वरित नियंत्रण कक्षाला कळणार
650 सीसीटीव्ही कॅमेरे : महत्त्वाच्या मार्गांवर, प्रवेशद्वारांवर व एकांत ठिकाणी नजर ठेवणार; फुटेज थेट पोलिस मुख्यालयात
पीटीझेड कॅमेरे : फिरते कॅमेरे 360 अंशात परिसर स्कॅन करतील; संशयास्पद हालचालींवर झूम
पॅनिक बटन : नागरिकांनी बटन दाबताच नियंत्रण कक्षाला तत्काळ सिग्नल; जवळील पथक घटनास्थळी रवाना
इमर्जन्सी स्पीकर/उद्घोषक यंत्रणा : संशयितांना त्वरित इशारा; नागरिकांना मार्गदर्शन
मोबाईल टॉवर व प्रकाशयोजना : नेटवर्क, प्रकाशअभावी तपासात येणारे अडथळे दूर; रात्रीही स्पष्ट दृश्य उपलब्ध.