पुणे : पुढारी वृत्तसेवा
बीआरटी मार्गात होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखणारी अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच 'बुम बॅरिअर'ची (स्वयंचलित फाटक) चाचणी नुकतीच यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता बीआरटी मार्गांमध्ये होणार्या खासगी वाहनांच्या घुसखोरीला आळा बसणार आहे. तसेच, ही यंत्रणा शहरातील सर्व बीआरटी मार्गांवर लवकरच पहायला मिळणार आहे.
खासगी वाहनांच्या बीआरटी मार्गांमध्ये होणार्या घुसखोरीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत होते. ते रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात एकूण चार प्रायोगिक तत्वावर 'बूम बॅरिअर' बसवण्याचे नियोजन केले आहे. त्यातील दोन ठिकाणी हे बुम बॅरिअर लावण्यात आले असून, त्यापैकी पिंपरीतील जगताप डेअरी चौकातील 'बूम बॅरिअर'ची चाचणी यशस्वी झाली आहे. येत्या सोमवारी पुण्यात डेक्कन कॉलेज चौकात बसविण्यात आलेल्या 'बूम बॅरिअर'ची चाचणी करण्यात येणार आहे.
पिंपरीतील जगताप डेअरी चौकात 'बूम बॅरिअर'ची अत्याधुनिक यंत्रणा उभारल्यानंतर त्याची सर्वप्रथम चाचणी घेण्यात आली. यावेळी हे 'बूम बॅरिअर' व्यवस्थितरित्या काम करते की नाही, हे पहाण्यात आले. तसेच, अधिकार्यांनी चाचणीकरिता यावेळी आपले खासगी वाहन बीआरटी मार्गातून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, खासगी वाहन आले तरी हे 'बूम बॅरिअर' उघडले नाही. त्याचवेळी पीएमपीच्या बीआरटी बस या मार्गातून जाण्यासाठी आल्या असता, आपोआपच 'बूम बॅरिअर'चे फाटक उघडले आणि बस जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून दिला.
बीआरटी मार्गातील अपघात रोखण्यासाठी 'बूम बॅरिअर' बसविण्यात येत आहेत. पुणे व पिंपरीत चार ठिकाणी प्रायोगिक तत्वावर बसवण्याचे नियोजन असून, यातील एक ठिकाणी बसवून त्याची चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाली असून, आता लवकरच शहरात सर्वत्र हे बूम बॅरिअर बसविण्यात येतील.
– दत्तात्रय झेंडे, बीआरटी विभाग प्रमुख, पीएमपीएमएल