फडणवीसांच्या ट्विटचा मी आनंद घेतो, शरद पवारांचे मिश्किल प्रत्युत्तर | पुढारी

फडणवीसांच्या ट्विटचा मी आनंद घेतो, शरद पवारांचे मिश्किल प्रत्युत्तर

जळगाव; पुढारी ऑनलाईन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटचा मी आनंद घेतो, अशी मिश्किल प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. जातीचे राजकारण करणे हा शरद पवारांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. सध्या शरद पवार जळगाव दौऱ्यावर आहेत.

फडणवीस यांनी ट्विटरवर ट्विटची मालिका करत शरद पवारांनी मतांसाठी लांगुलचालन केल्याचा आरोप केला होता. त्यांनी द काश्मीर फाईल्स वरून बदललेल्या भूमिकेवरून अजिबात आश्चर्य वाटतं नसल्याचेही ट्विटमध्ये म्हटले होते. त्यांनी बदललेली भूमिका त्यांना साजेशी असल्याचे म्हटले होते. तुष्टीकरणाचे धोरण आणि राजकारण तसेच जातीय धुव्रीकरण करणे हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड असल्याची टीका केली होती. फडणवीस यांच्या या टीकेवर पवारांनी उत्तर दिले आहे.

ज्यांचा अपेक्षाभंग झाला ते राज्य ताब्यात कसा घेता येईल यामागे लागलेत. त्यामुळे राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे सुरु आहेत. महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत आहे. राज्य ताब्यात घेण्याचे भाजपचे प्रयत्न असून मुलभूत अधिकाऱ्यांवर गंडातर आणण्याचे काम सुरु असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेवर त्यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे आता हिंदुत्वाच्या मार्गाने जाताहेत असं दिसत आहे. पण सामाजिक एेक्य धोक्यात येता कामा नये, अशी चिंता पवारांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र एकसंघ ठेवला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

जेम्स लेनच्या पुस्तकांत शिवरायांबद्दल आक्षेपार्ह लिखाण आहे. पण पुरंदरे यांनी जेम्स लेनचं कौतुक केलेले आहे. जेम्स लेन हे चांगले शिवअभ्यासक होते असे पुरंदरे म्हणाले होते, असे सांगत पवार यांनी मनसेने समोर आणलेल्या पुरंदरेंच्या पत्रावर उत्तर दिले.

जेम्स लेन याच्या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी पत्र पुरंदरे यांनी ऑक्सफर्ड प्रकाशनला लिहिले होते. हेच पत्र मनसेने समोर आणत शरद पवार यांच्याकडे काही सवाल केले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button