Blood sample manipulation case : अधिष्ठात्यांचे ‘दोन्ही’ हात वर!

Blood sample manipulation case : अधिष्ठात्यांचे ‘दोन्ही’ हात वर!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक झाल्यावर ससूनच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी याबाबत हात वर केले आहेत. 'दोन डॉक्टरांना अटक झाल्याचे माध्यमांतूनच मला समजले; पोलिस किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पत्रानंतर कारवाईबद्दल विचार करू,' असे उत्तर देत त्यांनी विषय टाळला.

पोलिसांनी रविवारी रात्री डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना अटक केली. मात्र, ससूनमध्ये असे काही घडल्याचे सकाळपर्यंत माहीत नसल्याचे डॉ. काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी सुरुवातीला बराच वेळ पत्रकारांशी काहीही बोलण्यास नकार दिला. मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही, असे सांगत बसवून ठेवले. ससूनचे अधिष्ठाता आणि वरिष्ठ अधिकारी या नात्याने रक्त प्रकरणाबाबत तातडीने कारवाई करणे अपेक्षित असताना डॉ. काळे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यापूर्वीही विद्यार्थिनीचे रॅगिंग प्रकरण, उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावेळी डॉ. काळे यांनी बोटचेपी भूमिका घेतली होती.

या वेळीही त्यांनी तत्काळ चौकशी करण्याबाबत कोणतीही पावले न उचलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डॉ. काळे म्हणाले, ससूनमधील डॉक्टरांना अटक झाल्याचे मला रविवारी रात्री रुग्णालयातून कोणीही कळविले नाही. सोमवारी सकाळी मला बातम्यांमधूनच ही बाब समजली. पोलिसांनी याबाबत माझ्याकडे कोणतीही चौकशी केलेली नाही. वैद्यकीय शिक्षण विभागानेही चौकशीचे आदेश दिलेले नाहीत.

अधिष्ठात्यांनीच काढले होते पत्र

ससूनचे अधीक्षकपद गेल्या दोन वर्षांपासून संगीत खुर्ची बनले आहेत. दीड वर्षात या पदावर सहा अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. किरणकुमार जाधव यांच्याकडे ऑक्टोबरमध्ये अधीक्षकपदाची सूत्रे देण्यात आली होती. त्यानंतर तीन महिन्यांतच म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये कोणतेही ठोस कारण न देता डॉ. विनायक काळे यांनी वैद्यकीय अधीक्षकपदावर डॉ. अजय तावरे यांची नियुक्ती केल्याचे पत्र काढले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news