Blood sample case : डॉ. तावरेच्या तोंडी एकच बोल, फक्त पैसा..!

Blood sample case : डॉ. तावरेच्या तोंडी एकच बोल, फक्त पैसा..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससूनमधील रुग्णालयातील न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे (फॉरेन्सिक डिपार्टमेंट) प्रमुख डॉ. अजय तावरे हा गुन्हेगारी मानसिकतेचा असून, त्याच्या तोंडी सतत पैशांचीच भाषा असल्याचे बोलले जाते आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून, त्यामध्ये अनेक गौडबंगाल दडल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. बिल्डरपुत्राच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपावरून डॉ. तावरे याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, तावरे हा ससूनच्या न्याय वैद्यक विभागाचा प्रमुख असल्यामुळे कोणत्याही शवविच्छेदनानंतर अंतिम अहवाल त्याच्याच सहीशिवाय मंजूर होत नाही. त्याने दिलेले अहवाल गुन्ह्यातील तपासात महत्त्वाचे आणि अंतिम मानले जातात. याच अधिकाराचा वापर करत तावरे हा अनेकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळत असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्या नातेवाइकाने आक्षेप घेतला तर त्याचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात केले जाते.

यामध्ये डॉ. तावरेची भूमिका महत्त्वाची असते. त्याच संधीचा फायदा घेत तो अनेक खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनादेखील ब्लॅकमेल करून पैसे उकळत होता. एखाद्या प्रकरणात काही तथ्य नसले तरी तो आपल्या अहवालात समोरच्या व्यक्तीला अडचणी निर्माण होतील, असा शेरा देत असे. त्यामुळे अनेकजण त्याला घाबरून होते. गेल्या काही दिवसांत तावरे याने ससूनमध्ये काही लोकांना हाताशी धरून आपले वर्चस्व निर्माण केले. तोच ससूनचा सर्वेसर्वा असल्यासारखे वावरत होता. त्यामुळेच ससूनमधील सर्वात ताकदवान अधिकारी म्हणून बिल्डर विशाल अगरवालने त्याच्यासोबत संपर्क साधून संगणमत केले. तावरेला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. प्राथमिक पाहणीत त्याच्या मोबाईलमध्ये अनेक गंभीर बाबी पोलिसांना दिसून आल्या आहेत. मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर दडलेले गौडबंगाल यातून बाहेर निघू शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

तावरेचे केबिन बनले होते एटीएम

डॉ. तावरे याची मोडस ऑपरेंडी एखाद्या सराईत गुन्हेगारी डोक्याच्या व्यक्तीसारखीच असल्याचे दिसून येते. आपण डॉक्टर आहेत, हेच तो विसरून गेला होता. त्यामुळे त्याच्या हातात असलेल्या अधिकाराचा गैरवापर करत तो म्हढ्याच्या टाळूवरेच लोणी खाण्याचे सोडत नव्हता. बड्या माशांना हेरून त्यांची दुखरी नस ओळखून तो केबिनमध्येच पैशांचे डिलिंग करत असल्याचे समजते.

पैसे मोजा अन् रिपोर्ट बदला…

डॉ. तावरे याने जणू ससून रुग्णालयात वैद्यकीय अहवाल बदलून देण्याचा गोरखधंदाच सुरू केल्याचे सूत्र सांगतात. कोणत्याही प्रकरणात पैसे मोजा आणि हवा तो रिपोर्ट घेऊन जा, अशीच त्याची ओळख असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याने आत्तापर्यंत अनेक गोपनीय वैद्यकीय अहवाल बदलल्याचा संशय आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news