10th Result: महापालिका शाळांचा निकाल 95.36 टक्के

10th Result: महापालिका शाळांचा निकाल 95.36 टक्के

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या माध्यमिक शाळांचा दहावीचा एकूण निकाल 95.36 टक्के लागला आहे. मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांचा हा एकूण निकाल आहे. मराठी आणि उर्दू माध्यमाच्या प्रत्येकी 4 शाळांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे.

महापालिकेच्या 17 मराठी माध्यमाच्या तर, 7 उर्दू माध्यमाच्या माध्यमिक शाळा आहेत. या सर्व शाळांचा निकाल 70 टक्क्यांच्या पुढेच लागला आहे. मराठी माध्यमाच्या शंभर टक्के निकाल लागलेल्या 4 शाळा तर, 90 ते 100 टक्के दरम्यान निकाल लागलेल्या 9 शाळा आहेत. 70 ते 85 टक्के दरम्यान निकाल लागलेल्या 4 शाळा आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांचा निकाल 95.52 टक्के इतका लागला आहे.

उर्दू माध्यमाचा 98.21 टक्के निकाल
महापालिकेच्या 7 उर्दू माध्यमिक शाळांचा एकूण निकाल हा 98.21 टक्के इतका लागला आहे. त्यामध्ये 100 टक्के निकाल लागलेल्या 4 शाळा आहेत. तर, 90 ते 100 टक्के दरम्यान निकाल लागलेल्या 3 शाळा आहेत.

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा (मराठी माध्यम) : माध्यमिक विद्यालय (कासारवाडी), माध्यमिक विद्यालय (संत तुकारामनगर), माध्यमिक विद्यालय (खराळवाडी), माध्यमिक विद्यालय क्रीडाप्रबोधिनी.

उर्दू माध्यम : माध्यमिक विद्यालय (लांडेवाडी), माध्यमिक विद्यालय (फुगेवाडी), माध्यमिक विद्यालय (थेरगाव), माध्यमिक विद्यालय (नेहरुनगर).

23 विद्यार्थी लाखाचे मानकरी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यशाचा आलेख उंचावणारे महापालिका शाळांतील 23 विद्यार्थी लाखाचे मानकरी ठरणार आहेत. त्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या 17 माध्यमिक तर, उर्दू माध्यमाच्या 7 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. त्याशिवाय, दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित देखील केले जाते. 80 ते 84.99 टक्के गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना 25 हजार, 85 ते 89.99 टक्के गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांना 50 हजार तर, 90 ते 100 टक्के गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. यंदा एक लाखाचे मानकरी ठरणार्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी माध्यमातील सर्वाधिक प्रत्येकी 5 विद्यार्थी हे माध्यमिक विद्यालय (भोसरी) आणि माध्यमिक विद्यालय (पिंपळे सौदागर) येथील आहेत. त्या खालोखाल माध्यमिक विद्यालय (कासारवाडी) आणि माध्यमिक विद्यालय (पिंपळे गुरव) येथील प्रत्येकी 3 विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. अन्य शाळांतील लाखाचे मानकरी : 2 विद्यार्थी : माध्यमिक विद्यालय (निगडी). शाळानिहाय प्रत्येकी 1 विद्यार्थी : माध्यमिक विद्यालय (संत तुकारामनगर), माध्यमिक विद्यालय (काळभोरनगर), माध्यमिक विद्यालय (नेहरुनगर), माध्यमिक विद्यालय (फुगेवाडी), माध्यमिक विद्यालय (रुपीनगर).

दरम्यान, 50 हजारांचे बक्षीस मराठी माध्यमाच्या 62 तर, उर्दू माध्यमाच्या 5 विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 25 हजाराच्या बक्षीसाचे मानकरी मराठी माध्यमाच्या शाळेतील 106 विद्यार्थी तर, उर्दू माध्यमाच्या शाळेतील 6 विद्यार्थी ठरणार आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त (माध्यमिक शिक्षण विभाग) विजयकुमार थोरात यांनी दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news