पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील माजी सभागृह नेते आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार हे येत्या काही दिवसांत शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत ते मातोश्रीवर शिवबंधन बांधणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शहर भाजपला मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान, एकनाथ पवार यांनी मात्र याबाबत आपली भूमिका नवरात्रीमध्ये स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे.
एकनाथ पवार हे नितीन गडकरी यांचे विश्वासू मानले जातात. त्यांनी 2014 मध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल 52 हजार मते घेतली होती. भोसरी मतदारसंघात पवार यांचे प्राबल्य आहे. महापालिकेत ते सभागृह नेते म्हणून काम पाहत होते. त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा
उमटवला आहे.
भोसरीतून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्याने एकनाथ पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते भाजपमध्ये नसल्यास त्याचा फटका महापालिका निवडणुकीत बसणार आहे. त्यांच्या गटातील काही नगरसेवक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
भाजप पक्ष सोडून मी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाणार असलेल्या चर्चांबाबत आता बोलणे योग्य होणार नाही. हा टायमिंग त्यासाठी चांगला नाही. नवरात्रीमध्ये मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.
– एकनाथ पवार, प्रदेश प्रवक्ते, भाजप.
हेही वाचा