

पुणे : उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू असताना हडपसरमधील फुरसुंगी भागात भाजप उमेदवाराच्या मुलासह दोघांना मद्य वाहतूक करताना पकडण्यात आले. निवडणूक आयोगाच्या पथकाने सोमवारी रात्री ही कारवाई केली.
या कारवाईत मद्याच्या बाटल्यांसह मोटार असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वेदांत राहुल कामठे (वय १९), आकाश तुकाराम मुंडे (वय २४, दोघे रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुहास गवळी (वय ३६, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत कामठे हा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल कामठे यांचा मुलगा आहे. गवळी हे निवडणूक आयोगाच्या पथकात नियुक्तीस आहेत.
निवडणूक काळात या पथकाकडून आचारसंहिता पालन तसेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. सोमवारी रात्री फुरसुंगी परिसरात तपासणी नाक्यावर गवळी नियुक्तीस होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून फुरसुंगीकडे भरधाव मोटार निघाली होती. मोटारीला तपासणी नाक्यावर थांबविण्यात आले. मोटारीची तपासणी करण्यात आली तेव्हा मोटारीत मद्याच्या बाटल्या सापडल्या.
मद्याच्या बाटल्यांबाबत पथकातील कर्मचाऱ्यांनी विचारण केली तेव्हा दोघांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. बेकायदा मद्य वाहतुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पाेहचले. मोटारीसह मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.