

पुणे: मावळ गौण खनिज प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय मागे न घेतल्यास 72 तासांच्या राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्य अधिकारी कर्मचारी महासंघाने राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच महसूल कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन कायम ठेवल्याने सामान्यांची कामे रखडली आहेत.
राज्य सरकारने मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात 4 तहसीलदार, 4 मंडळ अधिकारी व 2 ग््रााम महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने पुणे जिल्ह्यातील महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे.
याचा निषेध करत जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तालुका आणि गावपातळीवरील कामकाज ठप्प झाले आहे. या आंदोलनात सुमारे अडीच हजार कर्मचारी अधिकारी सहभागी झाले आहेत.
मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात 10 जणांना करण्यात आलेल्या कारवाईमुळे अतिरिक्त जिल्हधिकाऱ्यांपर्यंत नाराजी पसरली आहे. त्यामुळे हे निलंबन तत्काळ रद्द करून या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पूर्वपदावर पदस्थापना देण्यात यावी, अशी मागणी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनेने केली आहे.
दरम्यान, हे आंदोलन दुसऱ्या दिवशी ही कायम आहे. परिणामी तालुकापातळीवर सामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत आता राज्य अधिकारी व कर्मचारी महासंघाने हस्तक्षेप करत जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे. हे निलंबन येत्या 72 तासांत मागे न घेतल्यास हे आंदोलन राज्यव्यापी करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.