

बारामती : कट रचून बाप-लेकीचा खून केल्याच्या खटल्यात बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी तिघांना जन्मठेप (आजन्म कारावास) व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशाल सोपान वत्रे (रा. मसरनरवाडी, ता. दौंड), जयदीप जयराम चव्हाण (रा. येडेवाडी, लिंगाळी, ता. दौंड) व केरबा नारायण मेरगळ (रा. मेरगळमळा, मसरनरवाडी, ता. दौंड) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
खटल्याची हकीकत अशी : या तिघांनी रमेश तुकाराम बाराते व शीतल रमेश बाराते (रा. बाबुर्डी, ता. बारामती) यांचा खून केला होता. आरोपी विशाल वत्रे हा रमेश बाराते यांचा जावई असून शीतल ही त्याची मेहुणी होती. रमेश बाराते यांना दोन मुली होत्या. वत्रे याचा बाराते यांच्या थोरल्या मुलीशी विवाह झाला होता. मात्र, त्याला एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या शीतल हिच्याशी विवाह करायचा होता. तसेच बाबुर्डी येथील १६ एकर जमीन एकट्यालाच मिळावी असा त्याचा हेतू होता. रमेश बाराते व त्यांची कन्या शीतल यांनी यास मान्यता दिली नव्हती.
याच रागातून २२ मार्च २०१६ रोजी वत्रे याने रमेश बाराते व शीतल यांना जेवणाच्या निमित्ताने घरी बोलावले. त्यानंतर जयदीप चव्हाण व केरबा मेरगळ यांना त्या दोघांचा खून करण्याची सुपारी देऊन कट रचला. त्यानुसार दोघांनी रेकी केली. रमेश बाराते व त्यांची मुलगी शीतल हे मोटारसायकलवरून घरी जात असताना, हिंगणगाडा (ता. दौंड) गावच्या हद्दीत त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून चव्हाण याने दगडाने, तर मेरगळ याने कोयत्याने वार करून बाप-लेकीचा खून केला.
या प्रकरणी रमेश बाराते यांचे पुतणे अमोल जयराम बाराते यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी तपास करून आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. स्नेहल नाईक यांनी काम पाहिले. सरकार पक्षाकडून २० साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, मयत रमेश बाराते यांची पत्नी, तसेच वत्रे याची पत्नी असणारी मुलगी व इतर साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. अॅड. नाईक यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने भादंवि कलम ३०२ अन्वये दोषी ठरवत आरोपींना जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, तसेच कलम १२०-ब अन्वये जन्मठेप व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षाला पैरवी अधिकारी गोरख कसपटे, अंमलदार विठ्ठल वारगड व वेणूनाद ढोपरे यांचे सहकार्य लाभले.