बारामतीच्या विकासात व्यापार्‍यांचे मोठे योगदान : अजित पवार

बारामतीच्या विकासात व्यापार्‍यांचे मोठे योगदान : अजित पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीची आज शैक्षणिक माहेरघर, मेडिकल हब अशी ओळख निर्माण झाली आहे. शहर व तालुक्याचा वेगाने विकास झाला. विकासाच्या या प्रक्रियेत बारामतीतील व्यापारी बांधवांचीही मोलाची साथ मिळाली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामती व्यापारी महासंघातर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी, माजी नगराध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, किशोरकुमार शहा-सराफ, जगदीश पंजाबी, नरेंद्र गुजराथी, सुभाष सोमाणी, संभाजी किर्वे, प्रवीण अहुजा, सुरेंद्र मुथा, स्वप्निल मुथा, शैलेश साळुंके, संभाजी किर्वे, अ‍ॅड. केशवराव जगताप, सचिन सातव, सुनील पवार, जय पाटील, संभाजी होळकर आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, बारामती हे विकासाचे रोल मॉडेल बनत असताना साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती याबाबतही बारामतीची श्रीमंती वाढली पाहिजे. बारामतीतील व्यापारी वर्गाने सचोटीने व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपली. सामाजिक कामांसाठी नेहमीच मदत केली. त्यांचे योगदान विसरता येणार नाही, असे अजित पवार म्हणाले. शहर व तालुक्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हीच कशा पद्धतीने काम केले आहे, हे आवर्जून सांगाल. लोक यापूर्वी बारामतीत मुलगी द्यायची झाली तर विचार करीत होते. आता मुलीला बारामतीचेच सासर असावे असा आग्रह धरला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. सुशीलकुमार सोमाणी यांनी महासंघाच्या कार्याचा आढावा घेतला. अनिल सावळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय दुधाळ यांनी आभार मानले.

खिसा झटकला तरी जागेचे काम होईल

याप्रसंगी व्यापारी महासंघाने कार्यालयासाठी जागेची मागणी अजित पवार यांच्याकडे केली. याचा धागा पकडत ते म्हणाले, व्यापारी महासंघात अनेक मातब्बर आहेत. त्यांनी सदर्याचा खिसा झटकला आणि एखादा तुकडा पडला तरी त्यातून जागेचा प्रश्न मार्गी लागेल, या वक्तव्यावर मोठा हशा पिकला. महासंघाने केलेल्या मागण्या सोडविल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.

व्यापारी महासंघ अजित पवारांसोबत

माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी, जगदीश पंजाबी, नरेंद्र गुजराथी, संभाजी किर्वे, स्वप्निल मुथा आदींची भाषणे झाली. या सर्वांनीच बारामती व्यापारी महासंघ कायम अजित पवार यांच्यासोबत राहणार असल्याची ग्वाही या वेळी दिली. गुढीपाडव्याला अजित पवार यांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा आयोजित केला जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news