..तर बारामतीत भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता द्या!

..तर बारामतीत भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता द्या!
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला असला, तरी जर त्यांच्याकडे घरातल्याशिवाय इतर सक्षम उमेदवार नसेल, तर या जागेवर भाजपने सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी भावना पक्षातून व्यक्त होऊ लागली आहे. अजित पवार यांच्याकडे या मतदारसंघात त्यांच्या घरातील व्यक्ती वगळता दुसरा सक्षम उमेदवार नसल्याची चर्चा मतदारसंघात आता जोर धरू लागली आहे, त्या अनुषंगाने भाजपमधून ही मागणी होताना दिसत आहे. भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात बूथ पातळीवर पक्ष संघटना बांधणी जवळपास पूर्ण करत आणलेली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या दौर्‍यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपला अतिशय पूरक वातावरण अजित पवार भाजपबरोबर येण्यापूर्वीच तयार झालेले आहे.

अशावेळी भारतीय जनता पक्षाच्या

चिन्हावरच येथील उमेदवार सहज निवडून येऊ शकतो अशी शक्यता भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
अजित पवारांनी आपल्या घरातीलच उमेदवार दिल्यास शरद पवारांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांना सहानुभूतीचा मोठा फायदा मिळू शकतो तसेच या वेळेला सुळे यांना निवडून आणण्यासाठी शरद पवार हे मोठ्या जिद्दीने आणि ताकतीने मतदार संघात उतरतील.
अशा वेळेला त्यांचा पूर्वीचा कार्यकर्त्यांचा संच,नव्याने त्यांना जुळलेले तसेच राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर नाराज असलेले स्थानिक नेते, कार्यकर्ते हे शरद पवारांना मदत करण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी पूर्वी त्रास दिलेली त्यांच्याच पक्षातील माणसे त्यांच्याच घरातील उमेदवार उभा राहण्याची वाटच पाहत आहेत.

सर्वसामान्य कार्यकर्ता हवा

भाजपनेही पक्षातील प्रस्थापित राजकीय घराण्यातील उमेदवार न देता सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद, आर्थिक रसद देऊन येथे उभे केल्यास भाजपला संधी मिळू शकते. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या प्रचंड ताकतीला तोंड देत गेल्या वीस वर्षांपासून अनेक कार्यकर्ते जिद्दीने या मतदार संघात काम करत आहेत त्यामुळे अशा कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यास या ठिकाणी भाजपचा निश्चितपणे विजय होऊ शकतो, हे कार्यकर्ते आर्थिक बाबीने कमी असल्याने ती बाब पक्षाने सांभाळावी अशी ही भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.

अजित पवारांच्या बरोबर असणारे लाभार्थीच ऐनवेळी अजित पवार यांचा घात करण्याची शक्यता भाजपचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.अशा अनेक कारणांमुळे अजित पवारांचा उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या तुलनेत बारामतीत कमकुवत होऊ शकते असा सूरही भाजपमधून व्यक्त होत आहे. अखंड राष्ट्रवादी असती तरी ही सुप्रिया सुळे यांचा यावेळी निवडणुकीत पराभव झाला असता असे वातावरण अजित पवार फुटून भाजपबरोबर येण्याअगोदर मतदार संघात भाजपने तयार केलेले आहे, त्याचा फायदा भाजपने उचलला पाहिजे अशी ही भावना भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. या मतदारसंघात भाजपची ताकद आता फार मोठी झालेली आहे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये राहुल कुल,पुरंदरमध्ये विजय शिवतारे असे बडे नेते भाजपकडे आहेत त्यातच अजित पवार यांची ताकद मिळालीतर भाजप उमेदवार सहज विजयी होऊ शकतो असे मत व्यक्त होत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news