बारामती : पुढारी वृत्तसेवा : काही जण यंदाच्या निवडणुकीत माझी ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगत तुम्हाला भावनिक करतील. ते नुसतेच माझी शेवटची निवडणूक म्हणतात, पण शेवटची निवडणूक केव्हा होईल हेच समजत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. 4) ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता लगावला होता. उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आता बारामतीत उलटसुलट चर्चा केली जात आहे. दादांनी तो शब्द टाळला असता तर बरं झालं असतं, असे मत जुन्या-जाणत्यांकडून व्यक्त केले जात आहे. अजित पवार यांचे वक्तव्य अनेकांना रूचलेले नाही.
शरद पवार यांनी राजकारणाचे बाळकडू अजित पवार यांना दिले. बारामतीसह पुणे जिल्हा व नंतर राज्य पातळीवर निर्णयाचे अधिकार दिले. मोकळीक दिली, त्या शरद पवार यांच्याबद्दल त्यांनी केलेले वक्तव्य अनेकांना रुचलेले नाही. विशेष म्हणजे गेले महिनाभरापासून बारामतीच्या होमपिचवर अजित पवार आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत. बारामतीतील सर्व संस्थांवर अजित पवार यांची मजबूत पकड आहे. त्यांच्या नियोजनामुळेच गत निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामतीने सव्वालाखांचे मताधिक्य दिले. त्या जोरावर त्या विजयी झाल्या. अजित पवार यांनी बारामतीला विकासाचे रोल मॉडेल बनविले, हे बारामतीकर नेहमीच मान्य करत आले आहेत.
त्यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळेच बारामतीकर ते सांगतील त्याला भरभरून मते देतात, अशी स्थिती असताना खासदारकीला मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी वेगळा विचार करेन, कोणाच्या बापाला भिणार नाही, हा निर्वाणीचा इशारा पवार यांनी का दिला, याचे कोडे बारामतीकरांना पडले आहे. ज्या बारामतीने त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्क्याने विधानसभेत पाठवले त्यांच्यावर पवार यांचा विश्वास राहिला नाही का, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर अजित पवार यांच्याकडून थेट शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांना टार्गेट केले जात आहे. गत पंधरवड्यातच अजित पवार यांनी बारामतीला चारदा मुख्यमंत्रिपद मिळाले पण विकासाची अपेक्षित गती साधता आली नाही, असे सांगत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.
रविवारच्या बारामती दौर्यात त्यांनी शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांच्यावरही नेम साधला. फक्त इकडे-तिकडे फिरणारा खासदार आपल्याला नको तर कामे करणारा हवा, या शब्दांत त्यांनी सुळे यांचे वाभाडे काढले. बारामतीचे मैदान अजित पवार यांना काहीही करून मारायचे आहे. तसा शब्द त्यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठांना दिला आहे. मागील वेळी ज्या जागा राष्ट्रवादीकडे होत्या, तेथे उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यात बारामतीचाही समावेश होतो. आता बारामतीत सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या गटाचा उमेदवार असेल, हे नक्की. तो कोण एवढीच फक्त उत्सुकता आहे.
पार्थ पवार यांच्या नावाला दिल्ली फारशी अनुकूल नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार याच सुळे यांच्या विरोधातील उमेदवार असतील अशी अटकळ आता बांधली जात आहे. त्यासाठीच अजित पवार हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहेत, यापुढे हा आक्रमकपणा अधिक वाढून आणखी टोकदार टीका होऊ शकते, असा अंदाज काही जण व्यक्त करत आहेत.
पवार यांच्या अन्य वक्तव्याबाबत येथील जनतेचे फारसे काही म्हणणे नाही. पण 'शेवटची निवडणूक', हे वाक्य अनेकांना खटकणारे ठरले आहे. ते नुसतेच माझी शेवटची निवडणूक म्हणतात, पण शेवटची निवडणूक केव्हा होईल हेच समजत नाही, या त्यांच्या वाक्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा