गोंड गोवारी समाज आंदोलक उपोषणावर ठाम; १० फेब्रुवारी रोजी बैठक

गोंड गोवारी समाज आंदोलन
गोंड गोवारी समाज आंदोलन

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा गोंड गोवारी समाजाच्या तरुणांचे संविधान चौकातील उपोषण आंदोलन आता अधिकच आक्रमक झाले आहे. आज या उपोषणाचा 12 वा दिवस असून, 24 एप्रिल 1985 च्या जीआरमध्ये दुरुस्ती होत नाही तोवर माघार नाही असा आंदोलकांचा निर्धार आहे. जिल्हा प्रशासनाशी रात्री झालेल्या चर्चेनुसार राज्य शासनातर्फे येत्या 10 फेब्रुवारी रोजी यासंदर्भात बैठक होणार असली तरी मूळ प्रश्न सुटत नाहो तोवर उपोषण सुरूच राहील या निर्णयावर आंदोलक ठाम आहेत. सोमवारी दुपारपासून हजारो गोंड गोवारी समाजबांधव या आंदोलनाच्या समर्थनात नागपुरात एकवटल्याने रात्री उशिरापर्यंत संविधान चौक, सीताबर्डी, महाराजबाग परिसर हा अतिशय वर्दळीचा वर्धा रोड आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून असल्याने जाम झाला होता. रस्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक नियंत्रण करताना पोलिसांची दमछाक झाली. व्हेरायटी चौकही ठिय्या आंदोलनाने अडवल्याने पोलीस,प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

26 जानेवारीपासून गोंड गोवारी समाज एसटीमधून आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. 23 नोव्हेंबर 1994 रोजी हिवाळी अधिवेशन काळात एका स्वल्पविरामासाठी 114 निष्पाप समाजबांधवांच्या जीवनाला पूर्णविराम लागला, पण हा प्रश्न अनेक सरकारे बदलूनही सुटलेला नाही. दरवर्षी हजारो समाजबांधव गोवारी स्मारकावर येऊन नतमस्तक होतात. आपल्या आप्तेष्ठांच्या आठवणींनी भावूक होतात. आता या समाजबांधवांनी पुन्हा निर्णायक लढा देण्याचे ठरविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच असताना कुणीही जबाबदार अधिकारी आमची व्यथा ऐकण्यास आलेले नाहीत म्हणून आंदोलक संताप व्यक्त करीत होते. दोन नायब तहसीलदार चर्चेला आले मात्र आंदोलकानी त्यांना परत पाठविले. अध्यादेशाशिवाय माघार नाही अशी भूमिका घेत रात्री उशिरापर्यंत हे आंदोलक रस्त्यावर कायम होते.

इतक्‍या मोठ्या प्रमाणात आंदोलक एकत्रित येत असताना गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली. पोलिसांचे वाहतुकीचे नियोजनही कोलमडले असा आरोप नागपूरकर करताना दिसले. गोड गोंड गोवारी जमातीला जात प्रमाणपत्रानुसार अनुसूचित जमातीचे सर्व लाभ देण्यात यावे, वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी किशोर चौधरी (वर्धा) सचिन चचाने (यवतमाळ) आणि चंदन कोहरे (बुलढाणा) हे तीन तरुण गणराज्य दिनी संविधान चौकात उपोषणाला बसले. त्यांच्या समर्थनार्थ उपोषणाच्या अकराव्या दिवशी सोमवारी हजारो गोवारी बांधव नागपुरात पोहोचले. या आंदोलनात सर्वश्री कैलास राऊत, अनिल राऊत, अरुणा चचाने, सरिता नेवारे, सरला चचाने, गीता मानकर, कुलदीप राऊत, अतुल चौधरी, आशिष नेवारे,सुमित बोरजे,संतोष वाघाडे, ईश्वर बोटरे, रामभाऊ वाघाडे, संदीप नेवारे आदी पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

14 ऑगस्ट 2018 पूर्वी व नंतर गोंड गोवारी जमातीला देण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रानुसार अनुसूचित जमातीचे लाभ द्या, जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्राच्या आधारे पदवी व इतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या रोखून ठेवलेल्या शिष्यवृत्ती द्या, पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची रोखून ठेवलेले पदवी प्रमाणपत्र द्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गोंड गोवारी जमातीची माहिती दुरुस्त करण्यात यावी,1950 पूर्वीचे पुरावे गोवारी, गवारी, गोवारा असले तरी गोंड गोवारी जमातीचे जात प्रमाणपत्र प्रकरणे स्वीकारण्यात यावी 18 डिसेंबर 2020 च्या निर्णयानुसार संवैधानिक व वैधानिक तरतुदीनुसार गोंड गोवारी जमातीच्या संस्कृती व रूढी परंपरांचे पालन करणाऱ्या अर्जदारांना गोंड गोवारी जमातीचे जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात यावे अशी या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news